मेट्रोचे कारशेड आरे वसाहतीत करण्याच्या मुद्दय़ावरून राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला आहे. आरे वसाहतीतल कारशेड होऊ देणार नाही, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी दिला. तर विकास थांबवणे योग्य नसून झाडे तोडली गेली तर त्या बदल्यात अनेक पटींनी झाडे लावली जावीत, हाच खरा शाश्वत विकास असल्याचे सांगत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मेट्रोची कारशेड आरे वसाहतीतच होणार असल्याचे सूचित केले.

शाश्वत विकासाबाबतच्या एका चर्चासत्राच्या निमित्ताने शनिवारी मेट्रो कारशेडच्या मुद्दय़ावर वादाची ठिणगी पडली. आरे वसाहतीमधील मेट्रोच्या कारशेडला स्थानिकांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला आहे. परंतु जागा बदलल्यास सुमारे दीड हजार कोटी रुपये अधिक लागतील  हे कारण देत एमएमआरडीएने प्रकल्प आरेतच करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीमध्येही मेट्रो प्रकल्पासाठी झाडे तोडण्यास प्रचंड विरोध झाला होता. पण दुर्मीळ झाडे अन्यत्र स्थलांतरित केली तर तोडलेल्या झाडांच्या बदल्यात अनेक नवीन झाडे लावण्यात आली.

– प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरणमंत्री

विकास प्रकल्प राबविताना जनभावनाही विचारात घेतली पाहिजे. आरेमध्ये कोणताही प्रकल्प होणार नसून तो दुसरीकडे करण्यात यावा.

– सुभाष देसाई, उद्योगमंत्री