वंदे मातरमवरुन राजकारण करण्यापेक्षा त्यासाठी कायदा करा, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘वंदे मातरम्’ वरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केले आहे. ‘१५ ऑगस्ट जवळ आल्यामुळे सध्या वंदे ‘मातरम्’ची चर्चा सुरु आहे. मात्र ‘वंदे मातरम्’ न म्हणणाऱ्यांना देशद्रोही म्हटले जाऊ शकत नाही, असे भाजपचेच काही नेते म्हणतात. मग आता कोण कोणाला काय बोलणार?,’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

विधीमंडळात गेल्या काही दिवसांपासून वंदे मातरमवरुन मोठा वाद झाला आहे. भाजपचे खासदार राज पुरोहित यांनी वंदे मातरमचा विषय सभागृहात अनेकदा उपस्थित केला आहे. यावरुन बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. ‘वंदे मातरम् म्हणावेच लागेल असे भाजपचे नेते म्हणतात आणि वंदे मातरम् न म्हणणाऱ्यांना देशद्रोही म्हटले जाऊ शकत नाही, असेदेखील भाजपचेच नेते म्हणतात. मग आता कोण कोणाला काय सांगणार?,’ असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मागील आठवड्याचत महासभेत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला काँग्रेस, मनसे, एमआयएम आणि समाजवादी पक्षाने विरोध केला. या प्रस्तावामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा ‘वंदे मातरम्’ म्हणावे लागेल. याविषयी बोलताना ‘आठवड्यातून दोनदाच का नेहमीच वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती करा,’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.