राजकीय गदारोळ आणि मित्रपक्ष भाजपशी कुरबूर सुरु असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या दुसऱ्या घराच्या बांधकामावरही लक्ष केंद्रित केले आहे. मातोश्रीपासून काही अंतरावर ठाकरे कुटुंबीयांच्या अलिशान घराचे काम सुरू असून, १० हजार चौरस फूटाच्या जागेवर सहा मजली घर बांधण्याचे काम सुरु आहे.

‘मुंबई मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांनी २०१६ मध्ये ‘मातोश्री’च्या समोर काही अंतरावर एक जागा विकत घेतली होती. ठाकरे कुटुंबाने घेतलेली जागा ही दिवंगत कलाकार के के हेब्बर यांच्या मालकीची होती. हेब्बर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुशीला यांच्या नावावर ही जागा होती. सुशीला यांनी मृत्यूपत्रात ही जागा तीन मुलांच्या नावे केली होती. या तिघांनी २००७ मध्ये ही जागा एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला विकली होती. या कंपनीने हेब्बर यांचा बंगला पाडून त्या ठिकाणी आठ मजली इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी घेतली. ऑक्टोबर २०१६ मध्ये ठाकरे कुटुंबाने ही जागा विकत घेतल्याचे वृत्तात म्हटले आहे. ११ कोटी ६० लाख रुपयांमध्ये हा व्यवहार झाल्याचे समजते. यात स्टॅम्प ड्यूटीचाही समावेश आहे. ऑक्टोबर २०१६ मध्येच ठाकरे कुटुंबाला या जागेवर बांधकामासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगीही मिळाली. बेसमेंट, स्टिल्ट पार्किंग आणि त्यावर सहा मजली बांधकाम होणार आहे. यातील एका फ्लॅटची उंची ही दोन मजल्यांऐवढी असेल. प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच बेडरुम आणि एक स्टडी रुम असेल. मुंबईतील ख्यातनाम बांधकाम कंपनीकडे हे काम सोपवण्यात आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

सध्या जागेवर बांधकाम जोमात सुरु आहे. ठाकरे यांच्या नवीन घराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या घरातून थेट वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स रोडला जाता येईल. कलानगरमधील अरुंद रस्त्यावरुन येण्याऐवजी थेट मुख्य रस्त्यावर जाता येईल. दरम्यान, कुटुंबियांकडून या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. शिवसेना नेत्यांनीही या वृत्तावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.