भाजपचे १५ ते २० नगरसेवक संपर्कात असल्याचा शिवसेनेचा दावा

गेल्या काही दिवसांपासून पालिका वर्तुळात शिवसेना आणि भाजप यांच्यात विविध विषयांवर वाद सुरू आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून डिसेंबरमध्ये भाजपला खिंडार पडणार असल्याचा दावा शिवसेनेकडून सोमवारी करण्यात आला. तर भाजपचे नगरसेवक शिवसेनेकडे ढुंकूनही पाहणार नाहीत, असा टोला भाजपने लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पालिका वर्तुळात शिवसेना आणि भाजप यांच्यात विविध विषयांवर वाद सुरू आहेत. प्रत्येक सभेत विविध मुद्दे उपस्थित करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपने आखली आहे.

पालिकेतील वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे भाजपचे अनेक नगरसेवक कंटाळल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. तसेच नगरसेवक फुटण्याच्या धसक्यानेच शिवसेनेवर बेछूट आरोप करून माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा खटाटोप भाजप करीत असल्याचा आरोप जाधव यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेत केला. अनेक नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असून डिसेंबरमध्ये भाजपला खिंडार पडेल, असा दावाही जाधव यांनी केला.

मुंबईतील सफाई कामगारांच्या ‘आश्रय’ योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने सिद्ध करून दाखवावा, असे आव्हानही शिवसेनेने दिले आहे. नगरसेवक फुटू नयेत यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून भाजपच्या नगरसेवकांना धमकावले जात असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

भाजपकडून खंडन

जाधव यांचे सर्व आरोप भाजपने फेटाळून लावले. भाजपचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार असून हिंदुत्वाची कास सोडलेल्या शिवसेनेकडे भाजपचे नगरसेवक ढुंकूनही बघणार नाही, असा टोला प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी लगावला. गेली २५ वर्षे युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा शिवसेनेला उमेदवार सापडत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठी उमेदवार दिलेले आहेत, असाही दावा शिरसाट यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivsena claims 15 to 20 bjp corporators touch akp

ताज्या बातम्या