पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ‘हिंदूुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण’ येथील जलाशयामध्ये १०० मेगावॉट क्षमतेच्या अक्षय संकरित ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई महानगरपालिका व खासगी भागीदार यांच्यात रविवारी ऊर्जा खरेदी करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे मुंबई महापालिकेच्या विद्युत खर्चात दरवर्षी सुमारे २३ ते २५ कोटी रुपयांची बचत होणार आह़े

पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त अजय राठोड, पाणी पुरवठा व मलनिस्सारण प्रकल्प खात्याचे विभागप्रमुख गायकवाड, संबंधित कंपनीचे रिबेक थॉमस आदी उपस्थित होते.  ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहिलेले हे स्वप्न साकार होत आहे. २०१७ च्या  वचननाम्यात जी वचने दिली होती, त्यातील हे एक वचन होते. मध्य वैतरणा धरणाच्या बांधकामाच्या वेळी दोन-तीन वेळा त्या ठिकाणी जाण्याचा योग आला. नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वात जलद गतीने बांधकाम झालेले हे जगातील नवव्या क्रमांकाचे धरण आहे. प्रकल्पातील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामधून ८० टक्के व जलविद्युत प्रकल्पामधून २० टक्के ऊर्जा प्राप्त होणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाल़े  सन २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्धारित करण्यात आले आह़े शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांनी केलेले काम पुढे न्यायचे आहे. या कामाच्या माध्यमातून कार्बन विघटन व पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने आपण एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे, ’ असेही ठाकरे म्हणाल़े

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी हा करार होत आहे, याचा आनंद आहे. ऊर्जा निर्मितीचे काम करणारी मुंबई पालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे, असे पेडणेकर यांनी सांगितले.  कार्यक्रमाच्या सुरूवातीला या प्रकल्पाच्या कामकाजाबाबत पी. वेलरासू यांनी माहिती सादर केली.

प्रकल्प असा..

’पालघर जिल्ह्यातील कोचले गावामध्ये २०१४ साली पालिकेकडून मध्य वैतरणा धरणाची विद्युत निर्मितीच्या अनुषंगाने बांधणी़

’मध्य वैतरणा धरणावर जल आणि सौर विद्युत निर्मितीच्या या प्रकल्पातून १०० मेगावॅट उर्जेची निर्मिती.

’संकरित अक्षय उर्जानिर्मितीचा पालिका स्तरावरील देशातील पहिलाच प्रकल्प़ 

’पालिकेच्या दरवर्षीच्या विद्युत खर्चात सुमारे २३ ते २५ कोटी रुपयांची बचत़ प्रत्यक्ष प्रकल्प दोन वर्षांनी कार्यान्वित होण्याची शक्यता़

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena construction of power project at madhya vaitarna dam akp
First published on: 24-01-2022 at 01:22 IST