‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना महत्त्व देऊन मध्यस्थी केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधील अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर मांडवली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या वादात मध्यस्थी करण्याऐवजी ठोस भूमिका घेऊन पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करू नका, लोकभावना संतप्त आहे, असे निर्मात्यांना बजावायला हवे होते, असे सेनेने अग्रलेखात म्हटले आहे. तर दुसरीकडे सिनेमागृहाचे पडदे जाळण्याची भाषा करणारे आता तेच ‘पडदे’ अंगावर पांघरून शांतपणे पहुडले आहेत, असा टोलाही सेनेने मनसेला लगावला आहे.
पाकड्या कलाकारांचे चित्रपट दाखवले तर चित्रपटगृहाचे पडदे जाळण्याची भाषा मुंबईने ऐकली, पण माचिस बॉक्स रिकामाच आहे. कारण ‘काड्या’ मुख्यमंत्र्यांनी जाकीटच्या खिशात ठेवल्या. यापुढे खाज आलीच तर त्याच काडीचा उपयोग कान खाजवण्यासाठी होऊ शकेल. पाक कलाकारांना अभय मिळाले असल्याने ‘पडदे’ एकदम सुरक्षित राहतील. पडद्यामागे बरेच घडले व सर्व विरोध वर्षा बंगल्यावरील चहाच्या पेल्यात विरघळून गेला, अशी बोचरी टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणारा आहे. आम्हाला आश्‍चर्य वाटते ते प्रखर राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी वगैरे भारतीय जनता पक्षाचे. पाकिस्तानी कलाकार व राजकीय नेत्यांच्या बाबतीत सरकारची नेमकी भूमिका काय आहे? ‘सार्क’वर हिंदुस्थानने बहिष्कार टाकला याचा अर्थ स्पष्टच आहे. पाकिस्तानशी संबंध ठेवायचे नाहीत हाच याचा अर्थ ना? दुसरे असे की, सध्या पाकिस्तानी चित्रपट आणि कलाकार याबाबत असलेला संताप लक्षात घेऊन ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून पाक चित्रपटांना वगळण्याचा निर्णय झालाच आहे. त्यामुळे याप्रश्‍नी कायदा, सरकारची भूमिका, राजशिष्टाचार यापेक्षा ‘पब्लिक क्राय’ नामक प्रकार महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाक कलाकारांच्या प्रश्‍नी सरकार किंवा सत्ताधारी राजकीय पक्षाने बोटचेपी भूमिका घेण्यापेक्षा ठोस भूमिका घेणे गरजेचे होते, असे सेनेने म्हटले आहे.
लष्कराला खंडणीचा पैसा नको! 
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत व्हावे यासाठी या चित्रपटाला विरोध करणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी यशस्वी समेट घडवून आणला होता. शिवसेनेचे महत्त्व कमी करण्यासाठीच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला थेट आव्हान देणाऱ्या राज ठाकरे यांची छबी मोठी करण्याचा डाव मुख्यमंत्र्यांनी खेळल्याची चर्चा यानंतर रंगली होती. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मनसेने चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र, सैनिक कल्याण निधीला पाच कोटींचा निधी आणि चित्रपटाच्या सुरुवातीला उरी आणि पठाणकोट हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहात असल्याचा फलक दाखवण्याची सक्ती या दोन अटी मनसे अध्यक्षांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर लादल्या. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘सैनिक कल्याण निधीला खंडणीचा पैसा नको आहे’ असा टोला लगावला होता.
मुख्यमंत्र्यांचा नवा डाव, शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेशी ‘डील’