चित्रपटापूर्वी सरकारी लघुपट दाखवण्याच्या केंद्रीय मंत्रिगटाच्या शिफारसीवरवरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे. लघुपट दाखविण्याचा हा प्रयोग ‘शायनिंग इंडिया’प्रमाणे भाजपवरच उलटू नये, अशी खोचक टीका सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांचे काम व नेतृत्व सक्षम आहे. देशाचा चेहरामोहरा बदलवून टाकण्याची धमक त्यांच्यात नक्कीच आहे, पण मोदी यांच्या यशाची चित्रे दाखविण्याची ही वेळ खरोखरच आहे काय? हा प्रयोग ‘शायनिंग इंडिया’प्रमाणे उलटू नये या शंकेनेच आम्ही मत मांडले. मोदी यांचे सरकार पाच वर्षांसाठी आहे. त्यामुळे या गोष्टी पाचव्या वर्षातच शोभून दिसतील. आता विरोधकांना टीकेला जागा मिळेल, अशा शब्दांत सेनेकडून सरकारच्या जाहिरातबाजीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
चित्रपटापूर्वी सरकारी लघुपट दाखवण्याची मंत्रिगटाची शिफारस  
केंद्रीय मंत्रिगटाने काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केंद्र सरकारच्या योजना तसेच राज्यातील व जिल्ह्य़ातील कामगिरी लोकांच्या नजरेत भरण्यासाठी त्याबाबतचे लघुपट चित्रपटगृहात दाखवावेत, अशी शिफारस केली होती. मात्र, त्यामुळे आणीबाणीच्या काळात ज्याप्रमाणे इंदिरा गांधींच्या जयजयकाराचे विकृतीकरण झाले होते, तशी वेळ भाजपवर येऊ शकते, असे अग्रलेखात म्हटले आहे. नेत्यांना व देवाला शेवटी त्यांचे भक्तच अडचणीत आणतात. महाभारतापासून आजच्या दिल्लीच्या राजकारणापर्यंत याची प्रचीती येत आहे. देशातील यशाचे चित्र सिनेमागृहांत दाखविले जाणार असेल तर मग त्यात पठाणकोट हल्ल्याचाही समावेश आहे काय? नक्षलवादी व कश्मीर खोर्‍यांतील अतिरेकी आमच्या जवानांचे बळी घेत आहेत. पंतप्रधान मोदींसमोर देशाचे सरन्यायाधीश रडले. हे यश मानावे की अपयश? , असे अनेक सवाल या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आले आहेत.