शिवसेना केवळ स्वाभिमानाची भाषा करते. प्रत्यक्षात मात्र सेनेला सरकारमध्ये राहून लाचारी पत्करण्याशिवाय पर्याय नाही, अशी खोचक टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलण्यात आल्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले. याशिवाय, आज झालेला मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा केवळ संख्यात्मक असून गुणात्मक नसल्याचेही चव्हाण यांनी म्हटले. गेल्या काही काळात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर सातत्याने कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरच आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात सेनेला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षांतील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेससारख्या विरोधी पक्षांकडून या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होत असून त्याचाच एक भाग म्हणून चव्हाण यांनी आज सेनेच्या जखमेवर मीठ चोळले.