scorecardresearch

संजय राऊत भेटीदरम्यान काय म्हणाले? कप्तान मलिक म्हणतात, “त्यांनी सांगितलं की घाबरुन…”

सकाळी दहाच्या सुमारास संजय राऊत नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

Nawab Malik Raut
राऊत यांनी आज मलिक कुटुंबियांची भेट घेतली

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घरी जाऊन भेट घेतली. मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर कालच मलिक यांची ईडीची कोठडी सात तारखेपर्यंत वाढवण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी मलिक कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती भेटीनंतर नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी दिली.

“असं काही होतं तेव्हा कुटुंबामध्येही निराशा येते. ज्याप्रमाणे पवारांनी आमची भेट घेऊन संपूर्ण पक्ष तुमच्यासोबत आहे असं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे आज शिवसेनेकडून संजय राऊत आले होते. त्यांनी माझी वहिनी, मुलं यांची भेट घेतली. त्यांनी असं सांगितलं की, सरकार तुमच्यासोबत आहे.
घाबरुन जाऊ नका असंही त्यांनी सांगितलं. जे काही आहे त्याचा आपण मिळून सामना करुयात, असंही ते म्हणाले,” अशी प्रतिक्रिया कप्तान मलिक यांनी दिली.

नक्की वाचा >> ३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे?

नवाब मलिक यांना कोठडी वाढवून दिल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता यावरही कप्तान मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं. “२३ तारखेला त्यांना सकाळी इथून घेऊन गेले. त्यांना किडनीसंदर्भात समस्या आहेत. त्याचं किडनीचं लेझर ऑपरेशन झालं आहे. त्यामुळे ३६ तास त्यांना औषध न मिळाल्याने त्यांच्या युरिनमध्ये रक्त आलं. ईडीच्या अधिकाऱ्यांना कळालं तेव्हा ते त्यांना घेऊन जे. जे. रुग्णालयामध्ये गेले. तिथे त्यांच्या तपासणीनंतर डॉक्टरांनी यांना दाखल करुन घ्यावं लागेल असं सांगितलं. त्यानंतर २५ ते २८ दरम्यान रुग्णालयात ठेवण्यात आलेलं. त्यामुळे ईडीने आम्हाला चौकशी करायला वेळ मिळाला नाही असं वकिलांमार्फत न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे न्यायालयाने सात तारखेपर्यंत वेळ वाढवून दिलाय,” असं मलिक म्हणाले.

नक्की वाचा >> “नवाब मलिक डान्सबार चालवायचे, बांगलादेशमधून मुली आणून त्यांना वेश्या…”; पुरावे असल्याचं सांगत भाजपा नेत्याचा आरोप

नवाब मलिक यांच्या मुलाला तसेच तुम्हाला ईडीची नोटीस आल्याच्या बातम्या होत्या, असं पत्रकारांनी विचारलं असता कप्तान मलिक यांनी, “तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला ईडीची अशी कोणतीही नोटीस आलेली नाही,” असं सांगितलं. “या बातम्या कुठून आल्या माहिती नाही. पण नवाब मलिक यांच्या मुलालाही नोटीस आली तर तो कार्यालयात जाऊन चौकशीत सहकार्य करेल,” असं कप्तान मलिक म्हणाले.

सकाळी दहाच्या सुमारास संजय राऊत हे कुर्ला येथील नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. यावेळी नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक, मुलगी मुलगी सना खान, बहीण नगरसेविका सईदा खान यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळेस संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनीही नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena leader sanjay raut visit nawab malik home in mumbai family revels what he had said scsg