‘भारत माता की जय’चा नारा संपूर्ण जगभरात घुमला पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणत असले, तरी जम्मू-काश्मिरच्या नियोजित मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती ‘भारत माता की जय’ म्हणणार का, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
जम्मू-काश्मिरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा दिलजमाई झाली असून, तेथील भाजप विधिमंडळ पक्षाने राज्यात पीडीपीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. या सत्तासमीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
संजय राऊत म्हणाले, संपूर्ण जगात ‘भारत माता की जय’चा नारा घुमला पाहिजे, असे मोहन भागवत यांना वाटते. त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. पण याची सुरुवात काश्मीरपासून झाला पाहिजे. जम्मू-काश्मिरच्या नियोजित मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती शपथ घेताना हा नारा देणार का, असा आमचा प्रश्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपने मेहबुबा यांच्याबरोबर नवा डाव मांडला, पण लाखो काश्मिरी पंडितांच्या जीवनाचा डाव अतिरेक्यांनी उधळून लावला आहे. हा डाव नव्या राज्यव्यवस्थेने पुन्हा बसवायला हवा. ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍या काश्मिरी पंडितांनी बलिदान दिले. त्यांनी सांडलेल्या रक्ताच्या सड्यावर नवे राजशकट उभे राहत आहे म्हणून नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधीआधी ‘भारतमाता की जय’ म्हणावे अशी अपेक्षा देशाने ठेवलीच तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.