scorecardresearch

“…जेव्हा बाळासाहेबांमुळे मुंबईच्या रस्त्यांवरील नमाज पठण बंद झालं”; संजय राऊतांनी करुन दिली आठवण

फक्त भोंगे लावून गोंगाट करुन चालत नाही, राज्यकर्त्याला तोडगा काढावा लागतो; संजय राऊतांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्याच्या विषयावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान सध्या जो काही राजकीय भोंग्याचा वाद सुरु आहे त्यामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे. हिंदुत्वाविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे असं शिवसेना खासदर संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मशिदी, मंदिरं, सभा किंवा राजकीय सर्व भोंग्यासंबंधी केंद्र सरकारने एक धोरण निश्चित करत कायदा करावा असं आवाहन यावेळी संजय राऊतांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेबांनी कशाप्रकारे मुंबईतील रस्त्यांवर सुरु असणारं नमाज पठण बंद केलं याची आठवण करुन दिली.

“हिंदुत्वाच्या नावावर ज्याप्रकारे राजकीय भोंगे वाजत आहेत, ढोंग सुरु आहे ते पाहता केंद्राने भोंग्यांसंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज आहे. आतापर्यंत गुजरातमधील लाऊडस्पीकर काढण्यात आलेले नाहीत. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्येही जाऊन पहा. गोवंश हत्यासंबंधी एक धोरण तयार केलं, पण काही राज्यांना तुम्ही सूट दिली. गोव्यासारख्या काही राज्यांनी तुमचं धोरण स्वीकारण्यास नकार दिला. मग काय झालं त्या राष्ट्रीय धोरणाचं? पण मी पक्षाच्या वतीने पंतप्रधानांना आवाहन करतो की, तुमच्या लोकांनी आणि त्यांच्या इशाऱ्यावर जो लाऊडस्पीकरचा वाद उभा केला आहे त्यावर राष्ट्रीय धोरण करा आणि सर्वात आधी बिहारमध्ये नंतर दिल्ली, गुजरातमध्ये लागू करा. महाराष्ट्र तर कायद्याचं पालन करणारं राज्य आहे. हिंमत असेल तर धोरण करा आणि सक्तीने त्यांची अंमलबजावणी करा,” असं आव्हानच संजय राऊत यांनी यावेळी दिलं.

Phone Tapping Case: ‘समाजविघातक घटक’ म्हणून ६० वेळा फोन टॅप करण्यात आल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “आपली निष्ठा…”

“सध्या जो काही राजकीय भोंग्याचा वाद सुरु आहे त्यामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे. हिंदुत्वाविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत. मशिदी, मंदिरं, सभा किंवा राजकीय सर्व भोंग्यासंबंधी धोरण निश्चित करत कायदा करा असंही ते केंद्राला म्हणाले.

“भाजपाला आता जाग आली आहे. त्यांना आता त्यांची झोप उडाली आहे. बाळासाहेबांची मशिदींवरील भोंग्याची भूमिका सर्वांना माहिती आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात कारवाया सुरु आहेत. आम्हाला कोणाकडून अक्कल शिकण्याची गरज नाही,” असं त्यांनी भाजपाला सुनावलं.

“शिवसेना प्रमुखांनी मुस्लिमांसंदर्भातील अनेक प्रश्न चर्चेने सोडवले होते. रस्त्यांवर नमाज पठणासंबंधी त्यांनी फक्त भूमिका घेतली नाही, तर तोडगा काढला. युतीचं सरकार आल्यानंतर तेव्हा प्रमुख मौलवींना, मुस्लीम नेत्यांना बोलावून रस्त्यावरील नमाज बंद करण्यास सांगितलं होतं. मौलवींनी नमाजमधील जागा छोटी पडत असल्याचं सांगितल्यानंतर बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना यांच्या मागणीचा विचार कऱण्यास सांगितलं. यानंतर निर्णय झाला त्यांना एफएसआय वाढवून दिला आणि रस्त्यावरील नमाज बंद झाले,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“फक्त भोंगे लावून गोंगाट करुन चालत नाही. राज्यकर्त्याला तोडगा काढावा लागतो आणि ती हिंमत तेव्हा शिवसेना आणि बाळासाहेबांमध्ये होती. हिंदूह्रदयसम्राट म्हणून बाळासाहेब स्वत:चे निर्णय स्वत: घेत होते. त्यांच्यावर कोणी निर्णय लादत नव्हतं,” असा टोला यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंचं नाव न घेता लगावला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena sanjay raut balasaheb thackeray mumbai namaz masjid loudspeaker sgy

ताज्या बातम्या