Anil Parab ED Raid: शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घऱी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले. ईडीने मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले असून तपास सुरु आहे. या कारवाईनंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली असून तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यावरुन संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठी बातमी! शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरु

संजय राऊत म्हणाले की, “अनिल परब आमचे सहकारी, कॅबिनेट मंत्री आणि कडवट शिवसैनिक आहेत. राजकीय सूडबुद्धीने अशा प्रकारच्या कारवाया सुरु आहेत. ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जात आहेत त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपाच्या लोकांवर आहेत. पण त्यांना कोणी हात लावत नाही. आम्ही सर्वजण पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत”.

ईडीने अनिल परब यांच्याविरोधात कारवाई सुरु करताच किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले “मलिक, देशमुखांप्रमाणे…”

“तुम्ही सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील, सरकार सुरळीत चालेल. अशा कारवायांमुळे भाजपा रोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या ५५ वर्षात कधी मिळालं नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

“तुमच्या हातात केंद्रीय यंत्रणा असल्याने म्हणून राज्यातील राजकीय विरोधकांना नामोहरम करावं असं कोणाला वाटत असेल तर शिवसेनेचं आणि महाविकास आघाडीचं मनोबल अजिबात खच्ची होणार नाही. उलट अशा प्रत्येक कारवाईमुळे मनोबल वाढत जाईल,” असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “आमच्याकडेही भाजपाच्या असंख्य लोकांविरोधात सबळ पुरावे आहेत. नवलानीला कोणी पळवलं याचं उत्तर सबळ पुरावे आहेत म्हणणाऱ्यांनी द्यावं”.

“महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील कारवाया फक्त सूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी आहेत. फक्त शिवसेनेला त्रास द्यायचा, बदनाम करायचं, महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. पण याचा आमच्या मनोबलावर कोणताही परिणाम होणार नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“मी सातत्याने तक्रार देत असून त्यावर साधं उत्तर येत नाहीये. विक्रांत घोटाळा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं मी मानतो. शौचालय घोटाळा अजून मोठ्या प्रमाणात समोर येईल. माझ्यावर मानहानीचा दावा टाकला म्हणून मी माघार घेणार नाही. इतर काही प्ररकरणात आम्ही हात घातला आहे. आम्ही ईडीकडे फाईल पाठवली असून ती उघडून पाहण्याची तसदीही कोणी घेत नाही. आम्हीसुद्धा पाहून घेऊ,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.

“शिवसेनेचे दोन उमेदवार मी स्वत: आणि संजय पवार हे आज १ वाजता राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील. महाविकास आघाडी एक आहे आणि राहील,” असं संजय राऊत म्हणाले. कपिल सिब्बल यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी जो पक्ष सोडतो तो वरिष्ठ नसतो असं एका वाक्यात उत्तर दिलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on ed raid on anil parab premises sgy
First published on: 26-05-2022 at 10:30 IST