उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजपा सत्ता राखेल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आह़े पंजाबमध्ये सत्तांतर होण्याचे संकेत असून, उत्तराखंड आणि गोव्यात त्रिशंकू स्थिती राहील, तर मणिपूरमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असा कल चाचण्यांमधून दिसतो. आता या पाच राज्यांचा कौल काय, हे १० मार्चला स्पष्ट होईल. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांचं ED विरोधात थेट मोदींना पत्र; भ्रष्टाचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे उघडे पाडण्याचा इशारा "एक्झिट पोलवर जाऊ नका. यापूर्वीही याचा फज्जा उडाल्याचा बघितलं आहे. १० तारखेला प्रत्यक्ष मतपेटीतून काय बाहेर येतं त्यावर मत व्यक्त करुयात. या देशातील अनेक राज्यांमध्ये प्रस्थापितांविरुद्ध राग आहे आणि तो मतपेटीतून स्पष्ट दिसेल. एक्झिट पोल खोटे सिद्ध होतील असा मला विश्वास आहे," असं संजय राऊत म्हणाले आहेत. काय सांगतोय एक्झिट पोल - उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्यात आल़े देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये भाजपाच्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठी घट होईल, मात्र ४०३ सदस्यांच्या विधानसभेत जवळपास २४० जागांसह हा पक्ष बहुमत मिळवेल, असा अंदाज आहे. समाजवादी पक्षाने सत्ताधारी भाजपाला जोरदार लढत दिली असून, हा सप आघाडी सुमारे दीडशे जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहील, असे संकेत या चाचण्यांतून मिळाले आहेत. बसप ५ ते १५ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहणार असून, काँग्रेसला कोणत्याही चाचणीत दोन अंकी जागा देण्यात आलेल्या नाहीत. पंजाबमध्ये पक्षांतर्गत गटबाजीशी झुंजणाऱ्या काँग्रेसला सत्तेवरून खेचून आम आदमी पक्ष ११७ पैकी ५१ ते ७५ दरम्यान जागा जिंकेल, असे भाकित या चाचण्यांनी वर्तवले आहे. बहुमताचा ५९ हा आकडा पार केला, तर हा पक्ष राज्यात सत्तेवर येईल. काँग्रेस दुसऱ्या, तर अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर राहील, असा अंदाज आहे. भाजप येथे दोन आकडी संख्या गाठू शकणार नाही, असे दिसते आहे. उत्तराखंड विधानसभेत एकूण ७० जागा असून, येथे बहुमतासाठी ३६ जागांची आवश्यकता आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी येथे भाजपाला २६ ते ४६ दरम्यान, तर काँग्रेसला २० ते ३५ जागांचा अंदाज वर्तवला असल्याने येथेही त्रिशंकू स्थिती राहण्याची शक्यता आहे. कुठलाही तिसरा पक्ष येथे स्पर्धेत नाही. गोव्याची निवडणूक अतिशय चुरशीची झाली़ मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपा आणि काँग्रेस यांना प्रत्येकी १६ च्या आसपास जागा दिल्या आहेत. ४० सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी २१ जागांची आवश्यकता आहे. मात्र, कोणताही पक्ष स्वबळावर हा आकडा गाठू शकणार नसल्याने येथे त्रिशंकू विधानसभा निश्चित मानली जाते. हे भाकित खरे ठरल्यास, बराच गाजावाजा करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ‘आप’ व तृणमूल काँग्रेस यांच्या हाती फारसे काही लागणार नाही, अशी चिन्हे आहेत. ६० सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३१ जागा भाजपा मिळवेल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. हा पक्ष २३ ते ४३ दरम्यान जागा जिंकेल, तर त्याच्या सुमारे निम्म्या जागा जिंकून काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.