महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसंच १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचंही म्हटलं. यावेळी राज ठाकरे यांनी आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार असा सवालही केला. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. दरम्यान त्यांच्या या टीकेवर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले –

“काही लोकांना ही गोष्ट हवी आहे, काही लोकांना कशाला राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. याआधी जात नव्हती का? होती, पण त्याआधी जातीचा अभिमान होता. मात्र, १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा यांनी दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला,” असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले “अक्कलदाढ उशिरा…”

“बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे”

राज ठाकरे म्हणाले, “तो त्या जातीचा हा या जातीचा असं म्हणत फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं आमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे. आम्हाला इतिहास वाचायचा नाही. लिहिला कोणी, पुरंदरे, ब्राह्मण, अच्छा म्हणजे यांनी चुकीचा लिहिला असणार.”

“जातीतून बाहेर पडणार नाही, मग आम्ही हिंदू कधी होणार?”

“आम्ही इतिहास वाचतच नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की जातपात गाडून स्वराज्यासाठी एक व्हा त्या महाराष्ट्रात जातीपातीवरून भांडणं सुरू आहेत, वाद सुरू आहेत, राजकारण सुरू आहेत. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, मग आम्ही हिंदू कधी होणार?” असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

संजय राऊतांची प्रतिक्रिया –

“आता आम्हाला थोडासा वैद्यकीयशास्त्राचा अभ्यास करावा लागेल की अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते. भाजपा आणि आमच्यात काय झाले ते आम्ही बघून घेऊ, तिसऱ्याची आम्हाला गरज नाही, आमच्यात जे काही झालं ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही यात पडायची गरज नाही. भाजपाचा लाऊडस्पीकर काल शिवाजी पार्कात वाजत होता, स्क्रिप्ट त्यांची होती, टाळ्या त्यांच्या होत्या आणि घोषणादेखील त्यांच्या होत्या,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“शरद पवारांनी जातीवाद परसरवला असं म्हणता…पण सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्या चरणाशी तुम्हीदेखील जात होतात. कशासाठी इतक्या मोठ्या माणसांवर बोलायचं. तेवढ्यापुरच्या टाळ्या मिळतात पण त्यादेखील प्रायोजित आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

“काल मेट्रोचं तसंच इतर काही प्रकल्पांचं उद्घाटन झालं, त्याच्यावर बोला. तुमच्या भोंग्याचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं यासाठी सरकार समर्थ आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा होता अशी टीका यावेळी संजय राऊतांनी केली. तसंच अक्कलदाढ उशिरा येते हे काल महाराष्ट्राला दिसलं असा टोलाही लगावला.

“काल त्यांनी मराठीभाषा भवनचं स्वागत करायला हवं होतं. महाराष्ट्राच्या राजधानीत इतकं मोठं कार्य घडलं आहे. त्याच्याविषयी काही बोलले नाहीत. फक्त टीका केल्याने काय मिळतं?आहे ते देखील गमवून बसाल,” असा सल्ला संजय राऊतांनी दिला. भाजपा त्यांची मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.

दोन्ही काँग्रेससोबत आघाडी केल्याच्या राज ठाकरेंच्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. “या देशात असं अनेकदा झालं. शेवटी बहुमत निर्माण होतं तेव्हा सरकार बनतं. युतीचं बहुमत झालं नाही. आघाडीचं बहुमत झालं. राज्याच्या स्थैर्यासाठी, खोटं बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनलं आहे हे त्यांना माहित आहे”.