MNS Shares NCP & Brij Bhushan Singh Photos: मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून मनसेने शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत राज ठाकरेंविरोधात रसद पुरवल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप केला होता. दरम्यान मनसेने हे फोटो शेअर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरेंविरोधात शरद पवारांनी पुरवली रसद? मनसेकडून पवार कुटुंब आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो ट्वीट; चर्चांना उधाण

मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे.

मनसेने शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो ट्वीट केल्यानंतर राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “बालिशपणा…”

राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकला हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं आहे.

संजय राऊतांनी दिलं उत्तर –

संजय राऊतांना या फोटोंबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “बृजभूषण सिंह यांना आम्हीदेखील ओळखतो. आम्हीदेखील एकत्र बसतो, जेवतो. फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं…संसदेचा अभ्यास करायला सांगा त्यांना. तिथे लोक एका सभागृहात बसतात, आजुबाजूला असतात. एकत्र चहापान करतात. योगींसोबत आम्हीदेखील चहापान करतो, म्हणून आम्ही काय योगींना त्यांना अडवण्यासाठी रसद पुरवली? हे अभ्यासात कच्चे आहेत”.

संभाजीराजेंवर प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. दुसकीकडे संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून छत्रपती घराण्याचा मान राखला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “ज्यांच्या नावावर शिक्तामोर्तब झालं आहे त्यांच्या नावाची घोषणा स्वत: उद्धव ठाकरे करणार. आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा सन्मान राखू, त्यामुळेच शिवसेनेकडून त्यांना ऑफर देण्यात आली होती. पण ते शिवसेनेचे उमेदवार असतील अशी आमची भूमिका आहे”.

किरीट सोमय्यांना उत्तर

किरीट सोमय्यांच्या पत्नीने १०० कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केल्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “१००० कोटींचा करु द्या, काम काय आहे त्यांना…ते भ्रष्ट आहेत. ज्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी संबंधित आयएनएस विक्रांतच्या नावाने घोटाळा केला, देशाची मानहानी केली, चोरी केली ते काय मानहानी करणार. अजून त्यांनी काही पाहिलेलं नाही, भविष्यात बरंच काही पहायचं आहे”.

किरीट सोमय्या विक्रांत घोटाळ्यातील आरोपी असून जामीनावर सुटले आहेत. कोर्टाने अटी आणि शर्थी लावल्या आहेत. तोंडाने बोलतात की दुसऱ्या कोणत्या अवयवाने ते पहावं लागेल असंही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on mns tweets photos of ncp sharad pawar brijbhushan singh sgy
First published on: 24-05-2022 at 11:15 IST