Phone tapping controversy in Maharashtra: शिवसेना खासदार संजय राऊत आणि एकनाथ खडसेंचा फोन समाजविघातक घटक म्हणून टॅप करण्याची आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पत्रातून ही माहिती उघड झाली आहे. एकनाथ खडसे यांचा फोन ६७ तर संजय राऊतांचा फोन ६० वेळा टॅप करण्यात आला होता. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“नाना पटोले, खडसे, माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचं खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले होते हे समोर येत आहे. गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग्ज तस्कर, गँगस्टर असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार तयार होत असताना आमच्यावर नजर ठेवत नव्या सरकारसंबंधी माहिती घेतली जात होती. आमच्या अभिव्यक्तीवर घाला घालण्यात आला,” असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की “एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून तुम्ही निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा ठेवता ती एका राजकीय पक्ष, नेत्यासंबंधी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे सर्व करत होती. आता रश्मी शुक्ला यांना केंद्र सरकार संरक्षण देत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे”.

“केंद्राने भोंग्यांसंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज”

“आता जे काही हिंदुत्वाच्या नावावर राजकीय भोंगे वाजत आहेत, ढोंग सुरु आहे हे ज्याप्रकारे सुरु आहे ते पाहता केंद्राने भोंग्यांसंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज आहे. आतापर्यंत गुजरातमधील लाऊडस्पीकर काढण्यात आलेले नाहीत. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्येही जाऊ पहा. ज्याप्रकारे गोवंश हत्यासंबंधी एक धोरण तयार केलं, पण काही राज्यांना तुम्ही सूट दिली. गोव्यासारख्या काही राज्यांनी तुमचं धोरण स्वीकारण्यास नकार दिला. मग काय झालं त्या राष्ट्रीय धोरणाचं? पण मी पक्षाच्या वतीने पंतप्रधानांना आवाहन करतो की, तुमच्या लोकांनी आणि त्यांच्या इशाऱ्यावर जो लाऊडस्पीकरचा वाद उभा केला आहे त्यावर राष्ट्रीय धोरण करा आणि सर्वात आधी बिहारमध्ये नंतर दिल्ली, गुजरातमध्ये लागू करा. महाराष्ट्र तर कायद्याचं पालन करणारं राज्य आहे. हिंमत असेल तर धोरण करा आणि सक्तीने त्यांची अंमलबजावणी करा,” असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.

“सध्या जो काही राजकीय भोंग्याचा वाद सुरु आहे त्यामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे. हिंदुत्वाविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत. मशिदी, मंदिरं, सभा किंवा राजकीय सर्व भोंग्यासंबंधी धोरण निश्चित करत कायदा करा असंही ते केंद्राला म्हणाले.

“भाजपाला आता जाग आली आहे. त्यांना आता त्यांची झोप उडाली आहे. बाळासाहेबांची मशिदींवरील भोंग्याची भूमिका सर्वांना माहिती आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात कारवाया सुरु आहेत. आम्हाला कोणाकडून अक्कल शिकण्याची गरज नाही,” असं त्यांनी भाजपाला सुनावलं.

“शिवसेना प्रमुखांनी मुस्लिमांसंदर्भातील अनेक प्रश्न चर्चेने सोडवले होते. रस्त्यांवर नमाज पठणासंबंधी त्यांनी फक्त भूमिका घेतली नाही, तर तोडगा काढला. युतीचं सरकार आल्यानंतर तेव्हा प्रमुख मौलवींना, मुस्लीम नेत्यांना बोलावून रस्त्यावरील नमाज बंद करण्यास सांगितलं होतं. मौलवींनी नमाजमधील जागा छोटी पडत असल्याचं सांगितल्यानंतर बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना यांच्या मागणीचा विचार कऱण्यास सांगितलं. यानंतर निर्णय झाला त्यांना एफएसआय वाढवून दिला आणि रस्त्यावरील नमाज बंद झाले,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“फक्त भोंगे लावून गोंगाट करुन चालत नाही. राज्यकर्त्याला तोडगा काढावा लागतो आणि ती हिंमत तेव्हा शिवसेना आणि बाळासाहेबांमध्ये होती. हिंदूह्रदयसम्राट म्हणून बाळासाहेब स्वत:चे निर्णय स्वत: घेत होते. त्यांच्यावर कोणी निर्णय लादत नव्हतं,” असा टोला यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंचं नाव न घेता लगावला.

“न्यायलयं एकाच पक्षातील नेत्यांना दिलासा देत आहेत हा न्यायव्यवस्थेतील घोटाळाच आहे. मी माझ्या मताशी ठाम आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.