राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे. हरिद्वारमध्ये बोलताना मोहन भागवत यांनी संत आणि ज्योतिषांच्या मते २० ते २५ वर्षात भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल. पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर १० ते १५ वर्षात अखंड भारत होईल असं म्हटलं आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करु सांगताना १५ वर्ष नाही १५ दिवसात करा असंही म्हटलं आहे. तसंच सर्वात आधी अखंड हिंदुस्थानचं स्वप्न पाहणाऱ्या वीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी केली आहे. यासोबतच बाळासाहेब आणि वीर सावरकरांचे आभार माना असा सल्लाही दिला.

“पुढील १५ वर्षात अखंड भारत पहायला मिळेल”, मोहन भागवत यांचं विधान; म्हणाले “जग फक्त शक्तीला मानत असेल तर…”

“अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करतो. कोणताही पक्ष त्याला विरोध करणार नाही. २०१४, २०१९ मध्ये भाजपाने याच मुद्द्यावर मतं मागितली. आधी पाकव्याप्त काश्मीर आणि नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान ताब्यात घ्या आणि अखंड हिंदुस्थान निर्माण करा. तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही. पण त्याआधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. कारण अखंड हिंदुस्थान त्यांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचंही स्वप्न होतं. तुम्ही सावरकर आणि बाळासाहेब यांचे आभार माना कारण त्यांनी ही संकल्पना रुजवली,” असं संजय राऊत म्हणाले.

“अखंड हिंदुस्थान जरुर करा पण आधी काश्मिरी पंडितांची घऱवापसी सन्मानाने आणि आदराने होऊ द्या. मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली आहे त्याचं कौतुक झालं पाहिजे,” असंही संजय राऊत म्हणाले.

“देश फाळणीच्या दिशेने ढकलताना दिसत आहे”

“मी रामनवमीला घडलेल्या घटना पाहिल्या. रामनवमी या देशात आधीही साजरी झाली आहे. भविष्यात ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत तिथेच ज्या पद्धतीने रामनवमीला हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला ही निवडणुकांची तयारी आहे. हे रामनवमीला याआधी झालेलं आठवत नाही. हे या देशाचं दुर्देव आहे. हा देश पुन्हा एकदा कोणीतरी फाळणीच्या दिशेने ढकलताना दिसत आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला.

मोहन भागवत काय म्हणाले –

मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारताची कल्पना मांडताना म्हटलं की, “हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. पुढील १५ वर्षात पुन्हा एकदा अखंड भारत पहायला मिळेल. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल. आमच्या मनात द्वेष नाही, पण जग शक्तीला मानतं मग काय करणार?”.

“सनातन धर्माचा विरोध करणाऱ्यांचंही आम्हाला सहकार्य आहे. जर त्यांनी विरोध करत आवाज उठवला नसता तर हिंदू जागा झाला नसता आणि झोपूनच राहिला असता,” असं मोहन भागवत यांनी यावेळी म्हटलं. धर्माचं उत्थान होईल तरच भारताचं उत्थान होईल आणि याला विरोध करणारे संपतील असंही ते म्हणाले आहेत. मोहन भागवत यांच्या हरिद्वार दौऱ्यात काही संतांनी त्यांच्याकडे देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली.