scorecardresearch

संजय राऊतांचं ED विरोधात थेट मोदींना पत्र, भ्रष्टाचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे फाडण्याचा इशारा; म्हणाले…

ईडी संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे १३ पानांचे पुराव्यासह पत्र दिलं आहे, संजय राऊतांची माहिती

Shivsena, Sanjay Raut, ED, PM Narendra Modi,
ईडी संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे १३ पानांचे पुराव्यासह पत्र दिलं आहे, संजय राऊतांची माहिती

शिवसेना खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत असून यावेळी ते काय नवा गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यावेळीही संजय राऊत यांनी शिवसेना भवनातच पत्रकार परिषद घेणार असून वेळदेखील दुपारी ४ ची आहे. संजय राऊत यावेळी पुन्हा एकदा भाजपा नेत्यांवर निशाणा साधणार असून भ्रष्टाचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे उघडे पाडण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपण ईडीसंदर्भात पंतप्रधानांना १३ पानी पत्र लिहिलं असल्याची माहितीदेखील दिली.

“जे सत्य आहे, जो अन्याय आहे त्याला टार्गेट म्हणू नका. समोरच्या काही प्रमुख लोकांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे समोर आणले जात आहेत. काही विशिष्ट लोक आमच्यावर हल्ले करतात आणि त्याचवेळी मोठे घोटाळे करुन नामनिराळे राहतात. त्यांचे मुखवटे फाडले पाहिजेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“ईडी संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे १३ पानांचे पुराव्यासह पत्र दिलं आहे. अनेक पत्रकारांनी ते पत्र मीडियासमोर, देशासमोर ठेवण्याची विनंती केली आहे. ते पत्र मी आज देणार आहे. त्या पत्रावरुन केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचाराने किती पोखरल्या आहेत, कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात आणि राजकीय विरोधकांची कोंडी करुन, अडचणीत आणून भाजपाच्या राजकारणाला हातभार लावतात हे सगळं आहे. हे टप्पयाटप्याने बाहेर येईल. आज पहिला भाग बाहेर काढत आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

दरम्यान यावेळी त्यांना एक्झिट पोलसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “एक्झिट पोलवर जाऊ नका. यापूर्वीही याचा फज्जा उडाल्याचा बघितलं आहे. प्रत्यक्ष मतपेटीतून काय बाहेर येत त्यावर मत व्यक्त करुयात. या देशातील अनेक राज्यांमध्ये प्रस्थापितांविरुद्ध राग आहे आणि तो मतपेटीतून स्पष्ट दिसेल”.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena sanjay raut wrote letter to pm narendra modi over ed bjp corruption sgy