मुंबई: राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणूका पार पडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी शिवसेना शिंदे पक्षाने कंबर कसली आहे. तीन वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसाठी ‘सज्ज पुन्हा शिवसेना’ संकल्पना तयार करण्यात आली आहे. राज्यातील लोकसभा मतदार संघासाठी खासदार, आमदारांवर ४८ मतदार संघांची संर्पकप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या संकल्पनेतील पक्ष बांधणीला मुंबईतून सोमवारी सुरुवात करण्यात आली.

आगामी मतदार संघ पुर्नरचनेत मुंबईत लोकसभा, विधानसभा मतदार संघात मोठी वाढ होणार असल्याने मुंबईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे व पक्षाचे सचिव राहुल शेवाळे यांनी सोमवारी पक्षबांधणीचा शीव मधून श्रीगणेशा केला. देशातील जनगणना सुरु झाली आहे. लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे.आगामी मतदार संघ पुर्नरचनेत मुंबईत लोकसभा, विधानसभा मतदार संघ वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे पक्षाने मुंबईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी शिंदे पूत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतील पक्षाच्या बांधणीची जबाबदारी स्वत: घेतली आहे. निवडणूकीसाठी मतदार संघात काम करण्याचा ‘भाजप पॅर्टन’ शिवसेना शिंदे पक्षाने जसाच्या तसा स्विकारला आहे. भाजप निवडणूका संपल्यानंतर लगेच पुढील निवडणूकीची तयारी सुरु करते. ती कार्यपध्दती शिवसेना शिंदे पक्षाने सुरु केली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मित्रपक्ष असलेल्या शिंदे पक्षासमोर भाजप अनेक ठिकाणी एकमेकांसमोर शत्रूपक्ष असल्यासारखा उभा ठाकला होता. सातारा जिल्हा परिषद निवडणूकीत तर बहुमत नसताना भाजपने शिंदे पक्षाचे सदस्य गळाला लावून अध्यक्षपद मिळविले. तेव्हापासून शिंदे पक्षात कमालीची अस्वस्थता वाढली असून पक्षाला धोक्याची घंटा जाणवली आहे.

पक्षाच्या मंत्र्यांना पोलिसांची धक्काबुक्की सहन करावी लागली. राज्यात भविष्यात विरोधकांबरोबर भाजपशी दोन हात करण्याची वेळ आली तर पक्ष संघटना मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचा धडा शिंदे यांना मिळाला आहे. सात खासदारांच्या बळावर शिवसेना शिंदे पक्ष केंद्रात सत्ताधारी भाजपला पाठिंबा देणारा देशातील तिसरा पक्ष आहे.

मतदार संघ पुनर्रचनेनंतर राज्यात खासदारांची संख्या वाढणार आहे. या वाढत्या मतदार संघात पक्षाचे खासदार वाढविण्यासाठी शिंदे पक्षाने तीन वर्षाचा एक आराखडा तयार केला आहे. प्रत्येक मतदार संघात गटप्रमुखांपासून ते संर्पकप्रमुखांची एक रचना करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील या रचनेची सुरुवात शीव येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. या मोहिमेला ‘सज्ज पुन्हा शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे.