मुंबई : रस्त्यावरच्या आंदोलनातून आणि आक्रमक राजकारणातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या शिवसेनेने (शिंदे गट) आता भाजपप्रमाणे संघटनात्मक स्तरावर प्रशिक्षण संस्कृतीची वाट धरत संघटनेच्या विस्ताराचा (कॅडर डेव्हलपमेंट) प्रयोग सुरू केला आहे.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’शी वैचारिकदृष्ट्या संलग्न संस्था असलेल्या उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत शिंदे गटाचे नगरसेवक प्रशासन कसे चालवायचे, शहर नियोजन, विकास आराखडा (डीपी) कसा समजून घ्यायचा, सरकारी योजनांची अंमलबजावणी कशी करायची यांचे धडे गिरवत असून नगरसेवकांपाठोपाठ नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य तसेच पुढील टप्प्यात आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही प्रबोधिनीच्या चिंतन प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.

शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या चिंतन शिबिराला आतापर्यंत कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथील शिवसेनेच्या १५० हून अधिक लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली आहे. राज्यातील २९ महापालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांसाठीही टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. ठाण्यातील नगरसेवकांसाठी २४ आणि २५ ऑगस्टला प्रशिक्षण होणार असून सप्टेंबरमध्ये नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल येथील नगरसेवकांचे प्रशिक्षण होईल. गणेशोत्सवानंतर मुंबईसह अन्य महापालिकांतील नगरसेवकांचा क्रमांक लागणार आहे.

महासभेत प्रश्न मांडण्याचे धडे

महापालिकेतील महासभेची भूमिका, प्रशासनाकडून कामे करून घेण्याची पद्धत, विकासकामांसाठी निधी मिळविण्याचे मार्ग यांसारख्या विषयांवर या शिबिरात मार्गदर्शन केले जाते. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या मोठी असल्याने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज समजावून देण्यावर भर आहे. यात माजी प्रशासकीय अधिकारी, महापौर, लोकप्रतिनिधी, प्राध्यापक आणि प्रबोधिनीतील तज्ज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करतात.
“केंद्र-राज्य सरकारी योजनांचा लाभ मतदारांपर्यंत कसा पोहोचवायचा आणि अधिकाऱ्यांकडून कामे कशी करून घ्यायची, याचे प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांना शहर नियोजन, शहर विकास आणि डीपीआर याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे,” अशी माहिती प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ – पाटील यांनी दिली.

भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नियमितपणे प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतात. मात्र भाजप वगळता इतक्या मोठ्या संख्येने आपल्या लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

३० वर्षांनंतर पुन्हा प्रबोधिनीच्या वर्गात

शिवसेनेच्या या प्रशिक्षणाला ऐतिहासिक संदर्भही आहे. २००३ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेच्या नेत्यांचे प्रबोधिनीत प्रशिक्षण झाले होते. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः प्रबोधिनीत उपस्थित राहून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते. त्यानंतर तब्बल तीन दशकांनी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी पुन्हा प्रबोधिनीच्या वर्गात दाखल झाले आहेत.

‘शिवसेनेचा क्लास वाढायला हवा’

प्रशिक्षणाचे स्वागत करताना एका शिवसेना नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर पक्षाच्या कार्यपद्धतीवरच भाष्य केले. “अनेकदा नगरसेवक पालिकेच्या सभांमध्ये व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांत वेळ घालवतात आणि त्यात नागरिकांचे प्रश्न मागे पडतात. लोकांना डोंबिवलीत डॉक्टरला मारहाण करणारे रमेश म्हात्रे माहिती आहेत. पण केवळ म्हात्रे हे शिवसेनेचा चेहरा नाही. लोकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे लोकप्रतिनिधीही पक्षात आहेत. पक्षाचा ‘क्लास’ वाढवायचा असेल तर अशा प्रशिक्षणांची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.

आंदोलनाच्या राजकारणापासून अभ्यासाच्या राजकारणाकडे?

शिवसेनेच्या पारंपरिक आक्रमक आणि आंदोलनात्मक राजकारणापुढे बदलत्या राजकीय वातावरणाचे आव्हान आहे. “शिवसेना रस्त्यावर उतरून संघर्ष करत मोठी झाली. तो काळ वेगळा होता. आता ‘जेन झी’च्या आंदोलनांमधून तरुणांची राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी बदललेली दिसते. काळानुसार शिवसैनिकांनीही बदलणे आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया एका नगरसेवकाने व्यक्त केली.

कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे शिवसेना गटनेते श्रीधर पाटील यांनीही प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “विचारसरणीवर आधारलेले आणि विशिष्ट विषयावर अधिकारवाणीने बोलणारे समृद्ध मनुष्यबळ पक्षात तयार करायचे असेल तर अशा प्रशिक्षणाची गरज आहे. हीच संस्कृती शाखाप्रमुख स्तरापर्यंत पोहोचली तर त्याचा पक्षाला दीर्घकालीन फायदा होईल,” असे पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

शिबिरांचे समन्वयक आनंद परांजपे यांच्या माहितीनुसार, नगरसेवकांच्या प्रशिक्षणानंतर पक्षाच्या जिल्हा स्तरावरील नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठीही चिंतन शिबिर आयोजित करण्याचा विचार आहे. थोडक्यात केवळ निवडणूक जिंकणारे कार्यकर्ते नव्हे, तर प्रशासन, धोरण आणि लोकप्रश्नांवर अभ्यासपूर्वक भूमिका मांडणारे लोकप्रतिनिधी तयार करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.