scorecardresearch

राज्यकर्ते नालायक ठरल्यामुळेच रस्त्यावर उतरण्याची वेळ; शिवसेनेचा हल्लाबोल

चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका

राज्यकर्ते नालायक ठरल्यामुळेच रस्त्यावर उतरण्याची वेळ; शिवसेनेचा हल्लाबोल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन करुन स्वत:चेच हसे करुन घेतले, या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘राज्यकर्ते नालायक ठरल्यामुळेच शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागले,’ अशा शब्दांमध्ये शिवसेनेने सरकारवर तोफ डागली. ‘तुम्ही महागाई कमी करा, पेट्रोल-डिझेलचे दर खाली आणा. मग आम्ही कशाला आंदोलन करु?’, असा सवालदेखील शिवसेनेकडून विचारण्यात आला. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने सरकारवर ही टीका केली आहे.

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून मुंबईसह राज्यात आंदोलने करण्यात आली. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनांवर भाष्य करताना, शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन स्वत:चे हसे करुन घेतले, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावरुन शिवसेनेने त्यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. ‘महागाईविरोधात आंदोलन केल्याने शिवसेनेचे हसे झाले असे जे म्हणतात त्यांची नाळ जनतेपासून तुटली आहे. सत्तेच्या नशेने त्यांचा ‘इक्बाल कासकर’ झाला आहे. कासकर हा ‘नशे’च्या फेऱ्यात सापडल्याने त्याला मागचे पुढचे काहीच आठवत नाही आणि तो असंबद्ध असे काहीतरी बडबडत असल्याचे पोलीस तपासात दिसत आहे. सत्तेच्या जहाल ‘खोपडी’ दारूने राज्यकर्त्यांच्या डोक्याची हातभट्टी झाल्यानेच त्यांना ‘महागाई’विरोधात आंदोलन करणारे मूर्ख, हास्यास्पद वाटत असावेत,’ अशा शब्दांमध्ये शिवसेनेने पाटील यांचा समाचार घेतला.

अंगणवाडी सेविकांचा संप, त्यामुळे बालकांचे होणारे हाल आणि अच्छे दिन यावरुनही शिवसेनेने भाजपवर शरसंधान साधले. कुपोषित बालकांच्या सेवा करणाऱ्या माता-भगिनींचे प्रश्न खुंटीलाच टांगून ठेवणार असाल, तर शिवसेनेला रस्त्यावर उतरण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दांमध्ये ‘सामना’मधून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. ‘तुम्ही सध्या हवेत तरंगत आहात आणि आमचे पाय आजही जमिनीवर आहेत हा फरक जरा समजून घ्या. आमच्या डोक्याचे ‘गांडो थयो’ झालेले नाही,’ अशीही टीका शिवसेनेकडून करण्यात आली. अच्छे दिन म्हणत सत्तेत आले. मात्र सत्तेत येऊनही अच्छे दिन काही आलेच नाहीत. यामुळे मोदी सरकारचे घरोघरी हसू झाले आहे, असे म्हणत शिवसेनेने ‘अच्छे दिन’वरुन भाजपची खिल्ली उडवली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुनही शिवसेनेने सरकारला रडारवर घेतले. ‘शेतकरी कर्जमाफीची बोंबच आहे. ऑनलाइन अर्ज भरणे वगैरे ठीक असले तरी कर्जमाफीसाठी सरकारी अटींची पूर्तता करता करता कर्जबाजारी शेतकऱ्यांचे नाकीनऊ आले आहे. किंबहुना कर्जमाफी नको, या ‘अटी व शर्ती आवरा’ अशी सध्या बळीराजाची अवस्था झाली आहे. कर्जमाफी म्हणजे अद्यापि जणू ‘नाटक’च ठरले आहे आणि ते संपलेले नाही,’ असे म्हणत शिवसेनेने सरकारवर जोरदार टीका केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2017 at 08:07 IST

संबंधित बातम्या