देश काही कोणाची खासगी मालमत्ता नाही, असे सांगत अभिनेता आमिर खानची पाठराखण करणाऱ्या शरद पवारांना गुरूवारी शिवसेनेकडून लक्ष्य करण्यात आले. आमीर खानचा इतकाच पुळका आला असेल तर शरद पवारांनी बारामतीत बोलावून त्यास त्यांनी ‘निशाण-ए-बारामती’ पुरस्काराने सन्मानित करावे, अशी खोचक टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली आहे.
सिनेसृष्टीतील खानमंडळींना अधूनमधून देश सोडण्याची उबळ येते तसा काही राजकारण्यांनाही खानांना पाठिंबा देण्याचा डांग्या खोकला होत असतो. महाराष्ट्राचे आदरणीय वगैरे असलेले नेते शरद पवार यांनाही कराड मुक्कामी अशाच डांग्या खोकल्याची उबळ आली व त्यांनी आमीर खानच्या ‘देशद्रोही’ वक्तव्यास विरोध करणार्‍यांनाच ‘असहिष्णू’ ठरवून टाकले, अशा शब्दांत सेनेने पवारांवर टीकेचे प्रहार केले आहेत.
‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात असहिष्णुतेसंदर्भातील आमिरच्या वक्तव्यामुळे प्रचंड वादंग निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी आमिरची पाठराखण केली होती. अनेक लोक आणि शिवसेनेचे नेते आम्ही तुला पैसे दिले वगैरे सांगत आहेत. पण कोणी आमिरला देणगी दिलेली नाही. त्याने केलेल्या परफॉर्मन्ससाठी त्याला पैसे देण्यात आले आहेत. आमीरला देश सोडून जाण्यासही सांगण्यात येते आहे. देश काही कोणाची खासगी मालमत्ता नाही. आमीरविरोधात जे वातावरण सध्या देशात निर्माण झाले आहे. तीच तर असहिष्णुता असल्याचे यावेळी शरद पवारांनी म्हटले होते.
पवारांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना बेईमानांची पाठराखण करणे हीच काय सहिष्णुता, असा सवाल या अग्रलेखाच्या माध्यमातून पवारांना विचारण्यात आला आहे. आमीरने जे मिळवलेय ते अभिनय करून मिळवलेय, हा देश म्हणजे कुणाची खासगी मालमत्ता नाही, असेही पवारांनी सांगितले आहे. हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे, पण आमीरने जे मिळवलेय ते याच देशात मिळवलेय. तो पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानात असता तर आज या पदास पोहोचला नसता. ज्या देशाचे खायचे त्या देशावरच टांग वर करायची यालाच सहिष्णुता म्हणायचे हे पवारांचे सांगणे असेल तर आमीर खानला बारामतीत बोलावून त्यास त्यांनी ‘निशाण-ए-बारामती’ पुरस्काराने सन्मानित करावे, अशी खोचक टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.