मुंबई : भांडूपमधील शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेविका आणि खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजोल पाटील यांनी आपण ठाकरे परिवारासोबत आहोत अशी भूमिका घेतली असली तरी त्या गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेत येतात पण, पक्षापासून आलिप्त राहत असल्याचे चित्र आहे. ‘मातोश्री’वर गुरुवारी झालेल्या बैठकीलाही त्या उपस्थित नव्हत्या.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला. या सहा खासदारांमध्ये ईशान्य मुंबईतील खासदार संजय दीना पाटील यांचाही समावेश आहे. पाटील यांच्या बंडाच्या चर्चेनंतर त्यांची कन्या, नगरसेविका राजोल पाटील काय भूमिका घेणार याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. त्यातच राजोल पाटील यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती व त्यानंतर आपण पक्षासोबत आहोत व ठाकरे परिवारासोबतच आहोत, अशी भूमिका मांडली.
मात्र राजोल यांची पक्षनिष्ठा आहे की अपरिहार्यता आहे याचीही चर्चा सुरू होती. शिवसेना (ठाकरे) पक्षात राहणे ही जशी राजोल यांची गरज आहे, तशीच शिवसेना (ठाकरे) पक्षाचीही राजोल यांना पक्षात ठेवणे गरज आहे. राजोल यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका असली तरी त्यांची हकालपट्टी पक्षाला करता येणार नाही असे चित्र आहे.
राजोल यांनी पक्ष सोडलेला नाही आणि पक्षानेही त्यांची हकालपट्टी केलेली नाही. मात्र अशा स्थितीमुळे राजोल पाटील या गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून आलिप्त राहत असल्याचे चित्र आहे.
दोनच दिवसांपूर्वी ‘मातोश्री’ निवासस्थानी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीला दोन – तीन नगरसेवक अनुपस्थित होते. मात्र ते रितसर परवानगी घेऊन गैरहजर राहिले होते. राजोल पाटील या देखील बैठकीला आल्या नव्हत्या, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
या पाठोपाठ शुक्रवारी मुंबई महापालिका सभागृहाबाहेर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. पावसाळी दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिका सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नगरसेविका राजोल पाटील या आंदोलनात सहभागी नसल्याचे दिसले. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या सभागृहाच्या बाहेर घोषणा सुरू होत्या.
मात्र नगरसेवक राजुल पाटील घोषणाबाजीत सहभागी नव्हत्या. तर त्या तिथेच उभ्या राहून केवळ घोषणाबाजीकडे बघत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या सभागृहात येतात. परंतु, पक्षकार्यालयात जात नाहीत अशीही चर्चा आहे.
