scorecardresearch

“…म्हणून भाजपा आणि शिंदे गटातील महिला आमदार तणावाखाली”; ठाकरे गटातील आमदाराचं विधान

“…म्हणून निवडणुका घेण्याची त्यांची हिंमत होत नाही”

eknath shinde devendra fadnavis
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस ( इंडियन एक्स्प्रेस छायाचित्र )

सात ते आठ महिन्यापूर्वी राज्यात मोठं राजकीय नाट्य घडलं. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. या बंडानंतर अल्पमतात आलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मग, एकनाथ शिंदेंनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली.

सत्ता स्थापन केल्यावर तब्बल एक महिना महाराष्ट्राला मंत्रीमंडळ नव्हतं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीच एक महिना राज्याचा कारभार हाकला होता. त्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, अद्यापही सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) आमदाराने मंत्रिमंडळ विस्तार न होण्यामागे कारण सांगितलं आहे.

हेही वाचा : २०२४ ला लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार? उद्धव ठाकरे म्हणाले…

आमदार मनिषा कायंदे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला. तेव्हा त्या म्हणाल्या की, “आपण कोर्टाची तारीख पे तारीख म्हणतो, तसं अधिवेशन पे अधिवेशन चाललं आहे. सरकार टिकणार नाही, हे माहिती असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. त्यामुळे भाजपात तीन-चार वेळा निवडून आलेल्या महिला आमदार आहेत. त्यासुद्धा तणावाखाली आहे. यात शिंदे गटातील महिला आमदारांचाही सहभाग आहे. फक्त त्या कोणाशी बोलत नाहीत, आमच्याशी बोलतात.”

हेही वाचा : “मला राग येतच नाही जयंतराव”, देवेंद्र फडणवीसांच्या कोपरखळीवर अजित पवारांचा टोला; म्हणाले, “ते माफ करत सुटलेत!”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनभेद आणि मतभेद विसरून काम करण्याची विरोधकांना विनंती केली आहे. याबद्दल विचारलं असता कायंदेंनी सांगितलं, “हे लोकं निवडणुका घोषित करत नाही. कारण, त्यांनी माहिती लोकांचं समर्थन आणि सहानुभूती उद्धव ठाकरेंकडे आहे. म्हणून निवडणुका घेण्याची त्यांची हिंमत होत नाही. ते वेळकाढूपणा करत आहेत. त्यांनी तीन सर्वे केले असून, त्यात उद्धव ठाकरेंची सहानुभूती काही केल्या कमी होत नसल्याचं दिसत आहे. हेच त्याचं खरं दुखण आहे. म्हणून बावनकुळे अशी वक्तव्य करत आहेत,” असा टोला मनिषा कायंदेनी लगावला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 14:45 IST