मुंबई : पूर्वीचा सहकारी पक्ष भाजपची राजकीय कोंडी करण्यासाठी पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश व गोवा विधानसभेच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला आहे. उत्तर प्रदेशात जवळपास १०० तर गोव्यात सुमारे २० जागांवर लढण्याचा शिवसेनेचा विचार आहे.

आम्ही उत्तर प्रदेशातील एकूण ४०३ जागांपैकी १०० जागा लढवणार आहोत. दुसरीकडे, गोव्यात आम्ही २० जागांवर निवडणूक लढवू आणि युती करू शकतो, असे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी देऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्वाचे राजकारण करण्याचे संकेत वेळोवेळी दिले होते. हिंदुत्वाच्या राजकारणात भाजपला स्पर्धा निर्माण करण्यासाठीही शिवसेनेने उत्तर प्रदेश व गोव्यामध्ये  निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.