मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालय म्हणजे मच्छीबाजार आहे का, असा सवाल विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. पालिका कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली असून दोन दिवसापूर्वी झालेल्या एका घटनेनंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महापौर रितू तावडे यांनीही किशोरी पेडणेकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई महापालिकेतील शिवसेनेची पंचवीस तीस वर्षांची सत्ता घालवून भाजप सत्तेत विराजमान झाला आहे. इतक्या वर्षात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडे सर्व महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद ही आले आहे. त्यामुळे महापौर निवडणूक झाल्यापासून मुंबई महापालिका मुख्यालयात भाजपचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांचा वावर खूप वाढला आहे.
त्यातच दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेत आरोग्य समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. भाजपचे नगरसेवक हरीश भांदीर्गे हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. या निवडणूकीनंतर भांदीर्गे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालिका मुख्यालयात आले होते. जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर मोठी गर्दी जमली होती.
आरोग्य समिती अध्यक्षांच्या दालनाच्या पुढे काही अंतरावर विरोधी पक्षनेत्यांचे दालन आहे. विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर या तिथून जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून त्यांना जायला जागा मिळत नव्हती. तेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्याने कार्यकर्त्याला बाजूला होण्यास सांगितले. मात्र त्यावेळी पेडणेकर आणि कार्यकर्ता यांच्यात वादावादी झाली. तसेच आपल्याला धक्काबुकी झाल्याचेही पेडणेकर यांचे म्हणणे आहे.
किशोरी पेडणेकर यांचे म्हणणे काय?
मुंबई महापालिका मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी वाढू लागली आहे त्यांना सत्तेचा माज आलाय. त्यातून आपल्यामुळे धक्काबुक्की होतेय याचे भान पण त्यांना राहीले नाहीए. म्हणून मुंबई महापालिका म्हणजे मच्छीबाजार आहे का मी हा सवाल उपस्थित केलाय असे किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना म्हटले आहे.
महापौर रितू तावडे यांचा पलटवार
तर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही किशोरी पेडणेकर यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले आहे. इतकी वर्ष महापालिकेत फक्त कॅान्ट्रक्टरच फिरत होते पहिल्यांदा कार्यकर्ते येऊ लागले आहे त्यामुळे किशोरीताईंनी सवय करून घ्यावी असा उपरोधीक सल्ला महापौरांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिला.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे) आणि महायुती यांच्यात वारंवार खटके उडायला सुरुवात झाली असून महासभेत, स्थायी समितीत आणि आता मुख्यालयातील पॅसेजमध्येही वाद होऊ लागले आहेत.
