मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी सोमवारी बहुतांशी प्रमुख पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली, तसेच काही उमेदवारांना एबी फॉर्मही देण्यात आले. त्यामुळे त्या त्या प्रभागांतील अन्य इच्छुक उमेदवारांची नाराजीही उफाळून आली असून शिवसेना (ठाकरे) पक्षात नाराजांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली. अशा नाराजांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. शिवसेना(शिंदे) पक्षाने उशीरापर्यंत उमेदवारी जाहीरच केली नव्हती. भाजपमधील नाराजांनी आपले दु:खाचे कड आतल्याआत पचवून नाराजी बाहेर येऊ दिली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरीता आता केवळ मंगळवारचा एकच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सोमवारी बहुतांशी प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ज्या जागांवर फारसा तिढा नाही अशा जागांसाठी एबी फॉर्मही देण्यात आले. मात्र त्यानंतरही ज्यांना तिकीट नाकारले त्यांची नाराजी उफाळून आली. या नाराजीचा सर्वाधिक फटका ठाकरे यांच्या युतीला बसण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने स्वबळाचा नारा दिल्यामुळे या दोन पक्षात जागा जास्त आणि उमेदवार कमी अशी स्थिती होती. तर ठाकरे बंधूंच्या युतीमुळे शिवसेना (ठाकरे) आणि मनसे या दोन पक्षात नाराजांची संख्या जास्त होती. दोन्ही पक्षांचे बालेकिल्ले समानच असल्यामुळे एकेका जागेसाठी इच्छकांची मोठी यादी होती. त्यातून एकाची निवड झाल्यामुळे या पक्षात मोठ्या संख्येने उमेदवार, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ज्याला उमेदवारी मिळाली त्याला सोमवारी अर्ज भरण्याबरोबरच नाराजांची नाराजी दूर करण्याचेही काम करावे लागले. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी एबी फॉर्म घ्यायला आलेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होतीच पण ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनीही तिथे जमायला सुरुवात केली होती.
बहिण भाऊ यांनी दिला ठिय्या
धारावीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक दिवंगत राजेंद्र सूर्यवंशी यांचा मुलगा व मुलगी यांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर आपल्या वडिलांच्या छायाचित्रासह ठिय्या दिला होता. धारावीत त्यांचा प्रभाग क्रमांक १८६ आता आरक्षित झाला असून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा त्यांच्या मुलीने व्यक्त केली.
महायुती सावध
भाजपमध्येही आयातांना उमेदवारी दिल्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते माजी नगरसेवक नाराज होते. मात्र आपली नाराजी ते लपवत होते. तर शिवसेना (शिंदे) पक्षाने सोमवारी उशीरापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर न केल्यामुळे त्यांच्या पक्षातील नाराजी तोपर्यंत बाहेर आली नव्हती. त्यामुळे या नाराजी नाट्याचा दुसरा अंक मंगळवारी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
