लोकशाहीच्या चारही स्तभांनी लोकशाही वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे. लोकशाही कोसळली तर या स्तभांना काही अर्थ नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपद, आरे कॉलनी आणि मतदारांच्या हक्कावर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्दत आहे. पण ज्याने मतदान केलं आहे त्यालाच आपला प्रतिनिधी गुप्त पद्धतीने कुठे फिरत आहे याची माहिती नाही. मतदाराला आपण मत देऊन निवडून आणलेल्या प्रतिनिधीला पुन्हा मागे बोलवण्याचा अधिकार हवा. माहिमच्या मतदाराने टाकलेलं मत सूरत, गुवाहाटी, गोवा असं फिरायला लागलं आणि मतदारालाच जर ते मत कुठून कुठे फिरतंय कळालं नाही तर देशात लोकशाही कुठे आहे?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Eknath Shinde CM: “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही,” उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; अमित शाह यांना केली विचारणा

Aarey Metro Car Shed : “आरेचा आग्रह रेटू नका”, शिवसेना भवनमधील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची सरकारला विनंती!

“स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली, पण लोकशाहीचे धिंडवडे उडत आहेत ते थांबवायला हवं. मतदारांच्या मताचा बाजार मांडला जात असेल तर ते घातक आहे. लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे. ज्याने मत दिले त्याचा बाजार असा मांडला गेला तर ते चुकीचे आहे. मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल,” अशी भीती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

“हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही”

“ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन केलं आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केलं त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. मग हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. माझ्यात आणि अमित शाह यांच्यात शिवसेना-भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचं ठरलं होतं. तसं झालं असतं तर आज अडीच वर्ष झाली आहेत. जे काही घडलं ते सन्मामाने झालं असतं. या जोडगोळीने अशाच पद्धतीने अडीच वर्ष पूर्ण केलं असतं. मग त्यावेळी नकार देऊन आता भाजपाने असं का केलं?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, “शिवसेना तुमच्यासोबत अधिकृतपणे सोबत होती. लोकसभा, विधानसभेत आम्ही एकत्र होतो. निवडणुकीच्या आधी हेच ठरलं होतं. मग मला कशाला मधे मुख्यमंत्री होण्यास भाग पाडलं. तसं घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता”.

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

“जे आता भाजपासोबत जाऊ इच्छित आहेत किंवा गेलेत त्यांनी हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठीवर वार करुन पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणत आहेत. तर तसा हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“आरेचा आग्रह रेटू नका” 

“माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेचा आग्रह रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाची हानी होईल”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“आत्ता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत. पण मधल्या काळात तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो समोर आला होता. म्हणजे तिथे वन्यजीव आहेत. मला धोका हा वाटतो की आत्ता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर तिथे रहदारी सुरू झाल्यावर आजूबाजूच्या पर्यावरणातलं वन्यजीवन धोक्यात येईल. असं करता करता मग आता तिकडे काहीच नाही म्हणत अजून पुढे जाल, असं देखील उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

“..तर मेट्रो अंबरनाथ-बदलापूरपर्यंत”

“आम्ही मुंबईतलं जवळपास ८०० एकरचं जंगल राखीव करून टाकलं आहे. कांजूरमार्गची जमीन महाराष्ट्राची आहे. ती महाराष्ट्राच्या, मुंबईच्या हितासाठी वापरा. आरेचा मर्यादित वापर होणार होता. कांजूरला कारशेड गेल्यानंतर ती मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकेल”, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray press conference shivsena bhavan eknath shinde aarey colony democracy sgy
First published on: 01-07-2022 at 15:10 IST