शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्यांसंदर्भातील ‘विक्रांत घोटाळा’ प्रकरणामध्ये न्यायालयाच्या भूमिकेवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखामधून न्यायालयाकडून न्यायदान केलं जात असतानाच ठराविक पक्षाच्या लोकांना झुकतं माप मिळत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. अगदी मुंबै बँक घोटळ्यापासून पत्रा चाळ, गोवावाला कंपाउंड प्रकरणांपर्यंत थेट उल्लेख करत शिवसेनेनं न्यायदानासंदर्भात नाराजी व्यक्त केलीय.

“‘विक्रांत वाचवा’च्या नावाखाली कोटय़वधी रुपये गोळा करून अपहार करणाऱ्या संशयित गुन्हेगारांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. पैसे गोळा करणाऱया माफिया टोळीचे सूत्रधार किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र हे गेल्या काही दिवसांपासून फरार होते. उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यावर ते प्रकट झाले. ज्यांच्यावर पैशांच्या अपहाराचे गुन्हे दाखल झाले व न्यायालयाने ज्यांना पोलीस स्टेशनात रोज हजेरी लावायला सांगितले असे सोमय्या हे महाविकास आघाडीचे म्हणे घोटाळे बाहेर काढणार आहेत! सोमय्या यांच्यावरच घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. ‘आयएनएस विक्रांत वाचवा’च्या नावाखाली त्यांनी मोठय़ा प्रमाणात पैसे गोळा केले, हे पैसे राजभवनात जमा करू असे त्यांचे वचन होते. ती रक्कम मधल्यामध्ये गायब झाली. राजभवनाने तर पैसे जमा झालेच नाहीत असे लेखी सांगितले, पण आपले न्यायालय पैशांच्या अपहाराचा हा पुरावा आहे असे मानायला तयार नाही,” असं शिवसेनेनं ‘फसवणाऱ्यांना दिलासा! माय लॉर्ड, हे काय?’ मथळ्याखाली छापलेल्या लेखात म्हटलंय.

“स्वतः आरोपीचे वकील कबूल करतात की, पैसे गोळा केले ते राजभवनात जमा केलेच नाहीत. आरोपीने ते भाजपच्या कार्यालयात जमा केले. भाजप कार्यालयात विक्रांतचा निधी जमा केला व शेकडो लोकांची फसवणूक झाली हे मानायला आमचे न्यायालय तयार नसेल तर आपण कोणत्या युगातून जात आहोत, येणारा काळ किती कठीण आहे, हे लक्षात येईल. आरोपी सोमय्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला तेव्हा सत्र न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली. ती म्हणजे, ‘सोमय्या व त्यांच्या मुलाने बेकायदेशीरपणे पैसे गोळा केले. त्यांनी कोणत्याही कॉम्पिटंट ऍथॉरिटीची परवानगी घेतली नव्हती. हे कृत्य अप्रामाणिकपणाचे आहे. जनतेतून पैसे गोळा केले हे सकृतदर्शनी स्पष्टच दिसत आहे.’ हे जमा झालेले पैसे सोमय्या पिता-पुत्रांनी कोणालाही दिले नाहीत व जमा केलेल्या पैशांचा हिशेब ठेवला नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने आरोपींना जामीन नाकारला,” असं शिवसेनेनं निदर्शनास आणून दिलंय.

“जामीन नाकारताच आरोपी बाप-बेटे फरार झाले. आता आपल्या विद्वान हायकोर्टाने आरोपीला दिलासा देताना काय सांगितले ते पहा, तक्रार बऱ्याच वर्षांनी दाखल झाली. २०१३ ते २०२२ मध्ये तक्रार दाखल झाली नाही आणि घोटाळ्याचा ५७ कोटींचा आकडा कुठून आणला? पुरावा काय? वृत्तपत्रांतील बातम्यांवरून तक्रारदाराने गुन्हा दाखल केला. आदरणीय न्यायालयास साष्टांग दंडवत घालून विनम्रपणे सांगू इच्छितो की, माय लॉर्ड, २०१३ साली पैसे गोळा केले. ते राजभवनात जमा झाले असे देणगीदारांना वाटले, पण राजभवनानेच २०२२ साली घोटाळा उघड केल्यावर देणगीदार हादरले व आपली फसवणूक झाली म्हणून पोलीस स्टेशनात तक्रार दाखल करायला गेले. यात काय चुकले? घोटाळा ५७ कोटींचा की ५७ रुपयांचा हे तपासात सिद्ध होईल, पण मुख्य आरोपी सोमय्या व त्यांच्या मुलाने विक्रांतच्या नावावर जनतेला फसवून पैसे गोळा केले व अफरातफर केली हा गुन्हा आहेच. त्या अफरातफरीच्या गुन्ह्यास रंगसफेदी करता येणार नाही,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“बँकेत, पतपेढ्यांत, सार्वजनिक उत्सव मंडळात शे-पाचशे रुपयांचा हिशेब लागत नाही म्हणून फसवणुकीच्या गुह्याखाली न्यायालयाने सामान्य लोकांना जेलात पाठवले आहे. येथे मात्र चोराला पकडले म्हणून न्यायालयाने पोलिसांनाच दटावले आहे. सध्या गाजवली जात असलेली पत्रा चाळ, गोवावाला कंपाउंड प्रकरणे तर २०१३ च्या आधीची आहेत व ती उकरून काढून महाविकास आघाडीच्या लोकांवर खटले भरले गेले व त्यांना तुरुंगात पाठवले गेले, पण दुसऱ्या बाजूला मुंबै बँकेपासून ते विक्रांत निधी घोटाळ्यात ठोस पुरावे असताना न्यायालय जामीन देत आहे. दिशा सॅलियन प्रकरणातही महिला आयोगाच्या तक्रारीची दखल न घेता आरोपींना दिलासा दिला. महाराष्ट्रात एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत, पण काय करणार? मला न्याय हवा असेल तर मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळत नाही, असे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीशांचीच ही अवस्था तर सामान्यांचे काय? विक्रांत युद्धनौकेच्या नावावर पैसे गोळा करून अपहार करणे हा देशद्रोह नाही काय? माय लॉर्ड, तुम्हीच सांगा,” असं लेखाच्या शेवटी म्हटलंय.