मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरमतर्फे पाकिस्तानातील काही छायाचित्रकारांशी वार्तालापाचा कार्यक्रम ‘ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी मंगळवारी आयोजित केला होता. हा कार्यक्रमच उधळून लावण्याचा प्रयत्न काही शिवसैनिकांनी केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत शिवसैनिकांना कार्यक्रमस्थळापासून दूर नेले.
मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरमतर्फे सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानातील काही छायाचित्रकारांना भारतात बोलावले आहे. त्यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम मंगळवारी दुपारी प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास्थळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत सुधींद्र कुलकर्णींचा निषेध नोंदवला. सीमेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना भारतीय जवान शहीद होत असताना पाकिस्तानी लोकांना येथे बोलवून कार्यक्रम घेण्याची गरजच काय, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनीही या कार्यक्रमाचा निषेध केला. त्याचबरोबर पोलीस कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना अडविण्याऐवजी शिवसैनिकांना ताब्यात घेत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.