अपघात, तक्रारीनंतर महामंडळाचा निर्णय

शिवशाही बसगाडय़ांचे होणारे अपघात, चालकांबाबतच्या तक्रारी पाहता एसटी महामंडळाने यापुढे भाडेतत्त्वावर येणाऱ्या सर्व शिवशाही बसगाडय़ांवर एसटीचाच चालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०१९ पर्यंत भाडेतत्त्वावरील उर्वरित एक हजार शिवशाही बस सेवेत दाखल करण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.

एसटी महामंडळाने दोन हजार वातानुकूलित शिवशाही बसगाडय़ा ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ५०० एसटीच्या स्वत:च्या मालकीच्या आणि १,५०० बसगाडय़ा या भाडेतत्त्वावरील आहेत. मार्च २०१८ पर्यंत पहिल्या टप्प्यात १,२०० शिवशाही बस येणार होत्या. जून २०१७ पासून ते आतापर्यंत ९९८ शिवशाही बस ताफ्यात असून त्यात एस.टी.च्या स्वत:च्या मालकीच्या सर्व शिवशाही बसगाडय़ा दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे भाडेतत्त्वारील ४९८ बसही ताफ्यात असून आणखी १,००२ बस येणे बाकी आहे.

वातानुकूलित शिवशाही बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या सेवेपेक्षा अपघात, चालकांची वागणूक, बेदरकारपणे वाहन चालविणे इत्यादींमुळेच अधिक चर्चेत राहिली. शिवशाहीच्या अपघात झालेल्या गाडय़ांमध्ये भाडेतत्त्वावरील बस गाडय़ांबरोबरच एस.टी.च्या स्वत:च्या मालकीच्या बसगाडय़ांचेही मोठय़ा प्रमाणात अपघात झाले आहेत.

त्यामुळे एस.टी. महामंडळाने याची दखल घेऊन काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. शिवशाही वाहनांची लांबी, उंची, वजन, वाहनाची पुढील बाजू जास्त असून वाहनाच्या बॉडीचे जमिनीपासूनचे अंतर कमी आहे. या बदलामुळे महामंडळाच्या चालकांना बस चालविताना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. हे पाहता एस.टी.ने चालक व यांत्रिकी विभागांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत एस.टी. महामंडळाने २८३ अधिकारी, १,११२ यांत्रिकी कर्मचारी आणि ८७८ चालकांना प्रक्षिक्षण दिले. शिवशाहीमधील अनेक बदलांमुळे चालकांना वाहन चालविण्यात येणाऱ्या अडचणी पाहता आवश्यक असलेल्या २४ विभागांतील सुमारे २,५०० चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. गरजेनुसार यापुढे येणाऱ्या आणखी एक हजार भाडेतत्त्वावरील शिवशाही बस गाडय़ांवर या चालकांची नियुक्तीही करण्यात येणार आहे.

  • एप्रिल २०१९ पर्यंत भाडेतत्त्वावरील एक हजार शिवशाही बसगाडय़ा सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे.