मुंबई : शनिवारी सायंकाळच्या सुमारास माटुंगा पुलावरून शिवशाही बस पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी बसच्या एसी डक्टमध्ये शाॅर्टसर्किट होऊन त्यातून धूर येऊ लागला. बसमध्ये धुराचे साम्राज्य पसरले. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. चालकाने सतर्कता दाखवून, आपत्कालीन दरवाज्याची काच फोडली आणि प्रवाशांना बाहेर काढले. बस चालक आणि बसमधील २८ प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे एसटी महामंडळाद्वारे सांगण्यात आले. 
 
शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता दादर ते पुणे शिवशाही बस २८ प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली. ही बस सायंकाळी ६ वाजता माटुंगा पुलावर आली असता, बसच्या मागील बाजूच्या एसी डक्टमधून धूर येऊ लागला. बसमधील प्रवासी भयभीत झाले. काही प्रवाशांना आग लागल्याची जाणवले. प्रवाशांनी याबाबत चालकाला माहिती दिली. एसी डक्टमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली.

प्रवाशांना धूराचा त्रास होऊ लागल्याने आणि चालकाने प्रसंगावधान राखत, आपत्कालीन दरवाज्याची काच फोडली. यातून बसमधील दोन ते तीन प्रवासी बाहेर काढले. तर, बाकीचे प्रवासी शिवशाही बसच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडले. या घटनेत बसमधील प्रवासी आणि चालकाला दुखापत झाली नाही. या बसमधील प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बसगाडीने पुढील प्रवासासाठी पाठविण्यात आले, अशी माहिती एसटी महामंडळाद्वारे देण्यात आली. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. एसी फ्युज सर्किटमध्ये बिघाड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर आला, असे प्राथमिक अहवालात समोर आले आहे.