मुंबई: ‘पाडू’ यंत्राचा वापर याआधी कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला नाही. मग केवळ मुंबई महापालिका निवडणुकीत हा प्रयोग का केला जात आहे, असा सवाल करताना ‘पाडू’ यंत्राचा वापर मुंबईतील निवडणुकीत केला जाऊ नये, अशी मागणी शिवसेना-मनसे-राष्ट्रवादीच्या ‘शिवशक्ती’ युतीने निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत पाडू यंत्र मतदान प्रक्रियेत वापरले जाणार असल्याची पुसटशी कल्पना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिली नव्हती. आयोगाच्या राजकीय पक्षांच्या प्रतनिधींसोबत अनेक बैठक झाल्या. त्या बैठकांमध्येही या यंत्राचा साधा उल्लेखही करण्यात आला नव्हता. निवडणुकीत ऐनवेळी अशी नवीन यंत्रणा आणणे संशयास्पद असून लोकशाहीच्या पारदर्शकतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याचे मत या पत्राद्वारे ‘शिवशक्ती’ युतीच्या वतीने शिवसेना नेते सचिव अनिल देसाई आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी निवडणूक आयोगाकडे मांडले.

यंत्रात फेरफारीची शक्यता

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व अन्य यंत्रांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर तपासणी करून त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या लागतात. पाडू यंत्राबाबत असे काहीच करण्यात आले नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच शिवसेना आणि मनसेने कालबाह्य मतदान यंत्रांबाबत चिंता व्यक्त केली होती. मतदान यंत्रे जुनी आणि अविश्वसनीय असतील ती बदलणे आवश्यक होते. मात्र ‘पाडू’सारखे त्रयस्थ यंत्र जोडणे तांत्रिकदृष्ट्या किती सुरक्षित आहे याची कोणतीही खात्री राजकीय पक्षांना देण्यात आलेली नाही याकडेही पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. या यंत्राद्वरे मूळ बॅलेट युनिटमधील मतांची संख्या आणि डिस्प्लेवर दिसणारी संख्या यामध्ये तफशवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंत्राच्या सीलिंग प्रक्रियेत राजकीय प्रतिनिधींचा सहभाग नसल्याने फेरफारीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

निवडणूक आयोग सरकारला मदत करतेय – राज ठाकरे

आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचार नव्हता. प्रचार झाल्यानंतर एक दिवस मध्ये वेळ असतो. मात्र निवडणूक आयोगाने ही प्रथा मोडली. सरकारला जे हवे त्यासाठी निवडणूक आयोग काम करतेय. पत्रके वाटू शकत नाही पण पैसे वाटू शकतात का? ही मुभा आताच का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. निवडणूक आयोग सरकारला जे काही हवे ते करत आहे. दिनेश वाघमारे कशावरही उत्तर द्यायला तयार नाहीत. सरकारला ज्या सुविधा हव्यात त्यासाठी निवडणूक आयोग काम करतेय, अशी टीका त्यांनी केली. सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन की, आपापल्या विभागात लक्ष ठेवा. पैसे वाटप केले जात आहे. आनंदाची गोष्ट की, काही जण त्याला विरोध करत आहेत. निवडणूक आयोग याला मदत करतेय, हा आमचा आरोप आहे, असे ठाकरे म्हणाले. ‘पाडू’ मशीनलाही त्यांनी विरोध दर्शवला. ईव्हीएमला नवे मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? राजकारण्यांना हे मशीन दाखवावेसेही वाटले नाही. यात गडबड होणार नाही हे कशावरून, ही कुठली बेबंदशाही सुरू आहे, ही कसली लोकशाही आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.