धक्कादायक! २०१३ पासून मुंबईतून २,२६४ मुली बेपत्ता

मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतून महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र
मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतून महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. २०१३ सालापासून मुंबईतून २६ हजारापेक्षा जास्त मुली आणि महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी २,२६४ जणींचा अद्यापही शोध लागलेला नाही. विधानसभेमध्ये भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा आणि अन्य आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

२०१३ ते २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत मुंबईतून एकूण २६,७०८ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या. यात ५,०५६ अल्पवयीन मुली आहेत. बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांपैकी २४,४४४ जणींचा शोध लागला. पण २,२६४ जणी अद्यापही बेपत्ता आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच मंगळवारी ही माहिती दिली. राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतून बेपत्ता झालेल्या ५,०५६ अल्पवयीन मुलींपैकी ४,७५८ मुली सापडल्या तर २९८ मुलींचा शोध अजूनही सुरु आहे. या अल्पवयीन मुलींपैकी काही मुलींचे अपहरण झाले. त्याचप्रमाणे बेपत्ता असलेल्या २१,६५२ महिलांपैकी १९,६८६ महिला सापडल्या. १,९६६ जणींचा शोध अजूनही सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने मे २०१३ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार बेपत्ता झालेल्या सर्व अल्पवयींन मुलींची अपहरण म्हणून तक्रार नोंदवून घेण्यात आली असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shocking 26000 girls womens missing from mumbai

ताज्या बातम्या