मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव :  करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत खरेदीचा मुहूर्त म्हणून ओळखला जाणारा चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा गेली दोन वर्षे आर्थिक उलाढालींसाठी क्षीण ठरला असला, तरी यंदा त्याची जोरदार भरपाई राज्यभर पाहायला मिळाली. सोने, घर, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमधील ग्राहकांनी मुहूर्ताला महत्त्व दिले.  सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याची १०० कोटींची उलाढाल झाली. मुंबईतील सराफा बाजारातही शनिवारी सोने-चांदीच्या खरेदीचा उत्साह दिसून आला.

मुंबई सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८,९९० रुपये इतका राहिला. त्यात १९० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा मुंबईतील भाव ५२,४८० रुपये इतका वाढला. जीवनावश्यक वस्तूंचे दर चढे दर आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला असला तरी ग्राहकांनी महागाईच्या सावटाखाली पाडव्याच्या मुहूर्त साधत सोने खरेदी केली. मात्र ग्राहक यंदा मोठय़ा दागिन्यांची खरेदी न करता लहान दागिन्यांची खरेदी करण्यास पसंती देत आहेत. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच ग्राहकांनी नाणी आणि वळी खरेदीला प्राधान्य दिले.

नागपुरातही सुवर्णओढ..

नागपूर : नागपूरमधील बाजारात सोने चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह चार व दुचाकी वाहने मोठया प्रमाणात विकली गेली.  शहरात एक हजार कोटीची उलाढाल झाली.  सराफा बाजारात सोन्याची सर्वाधिक विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. वाहन विक्रीमध्ये दुचाकी वाहनापेक्षा चारचाकी वाहनांची विक्री जास्त झाली. नागपूरकरांनी दोन हजारपेक्षा जास्त दुचाकी तर ७०० पेक्षा अधिक चारचाकी वाहनांची खरेदी केली. मोबाईल आणि इलेक्ट्रानिक वस्तूंचीही मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. गुढीपाडव्यामुळे बांधकाम व्यवसायातही चांगली उलाढाल घडून आली.

नाणे खरेदीला पसंती :

शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक लहान दागिने तसेच एक ते पाच ग्रॅम सोन्याचे नाणे खरेदीला पसंती देत असल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शनिवारी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी वेढणी म्हणजेच सोन्याचे तार, सोन्याच्या नाणी, हलक्या वजनाच्या दागिन्यांच्या खरेदीला पसंती दिली.

सोन्याच्या भाव वाढीचा सोने खरेदीवर नक्की परिणाम झाला आहे. मात्र मुहूर्ताला सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. लग्नसराईच्या मोसमाला सुरुवात होत असल्याने बहुतांश ग्राहकांनी पुढील संभाव्य सोन्याच्या भाववाढीचा विचार करून पाडव्याला सोने खरेदीचा मुहूर्त साधला. 

-अमित मोडक, संचालक-मुख्य कार्यकारी अधिकारी, पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स

सुवर्णनगरीत..

गुढीपाडव्यानिमित्त उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावसह इतर बाजारपेठांमध्ये कित्येक कोटींची उलाढाल झाली. सुवर्णनगरी जळगावात गुजरात, मध्य प्रदेशातील ग्राहकांनीही प्रतिसाद दिल्याने सुमारे २० किलो दागिने खरेदी झाली.  ही उलाढाल शंभर कोटींच्या आसपास असल्याची माहिती आर. सी. बाफनाचे मनोहर पाटील, खोंडे ज्वेलर्सचे संतोष खोंडे यांनी दिली. 

सदनिका आणि वाहने..

मुंबई, नाशिक, पुणे शहरात अनेकांनी सदनिका खरेदी करण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. गुढीपाडव्याला सदनिका खरेदी करणाऱ्यांसाठी खास सवलतही देण्यात आली. अनेकांचा चारचाकी वाहन खरेदीकडे कल राहिला. नामांकित कंपन्यांच्या चारचाकी वाहनांसाठी नोंदणी झाली.

पुण्यात मोबाइल खरेदी..

पुण्यात मोबाइलच्या बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. मोबाइल उत्पादक विविध कंपन्यांनी गुढीपाडव्यानिमित्त खास सवलती देऊ केल्या होत्या. अ‍ॅपल मोबाइल घेणाऱ्यांना एचडीएफसी क्रेडिट कार्डवर सवलत देण्यात आली होती. अ‍ॅपल, सॅमसंग आणि वन-प्लस या तीन कंपन्यांच्या मोबाइलला चांगली मागणी होती.

घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू, थाळी , इत्यादी सारख्या वस्तूंसाठी चांदीच्या दागिन्यांना देखील यंदा मोठी मागणी राहिली.  गुढी पाडव्याला दिवसअखेपर्यंत २०१९ च्या करोनापूर्व पातळी इतकीच खरेदी होण्याची शक्यता आहे.

– सौरभ गाडगीळ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,    पीएनजी ज्वेलर्स