वेळेची मर्यादा कमी करण्याचे अधिकार स्थानिक  प्रशासनास

मुंबई : करोनाचा संसर्ग घटल्याने निर्बंध अधिक शिथिल करताना सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ पर्यंत तर उपाहारगृहे आणि बार रात्री १२ पर्यंत खुली ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. रुग्णसंख्या अधिक असलेले जिल्हे किं वा शहरांमध्ये ही वेळ कमी करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत.

करोना नियंत्रणात आल्याने दुकाने व उपाहारगृहांच्या वेळांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तज्ज्ञांच्या कृती गटाशी सल्लामसलत के ल्यावर घेतला होता. या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी के ली आहेत.

सध्या लागू असलेल्या अन्य निर्बंधांमध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. हे निर्बंध कायम असतील. सर्व प्रकारची दुकाने व उपाहारगृहांपुरताच अपवाद करण्यात आला आहे. उपाहारगृहे, बार, खाद्य पदार्थ पुरविणारे यांना रात्री १२ पर्यंतची वेळ वाढवून देण्यात आली आहे. सध्या उपाहारगृहांना रात्री १० पर्यंतच परवानगी होती. सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ पर्यंत खुली ठेवण्यास मुभा असेल. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध अशा अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये स्थानिक आवश्यकतेनुसार निर्बंध लावू शकते असेही आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.

बहुतांश निर्बंध शिथिल

दुसऱ्या लाटेनंतर लागू झालेले बहुतांश निर्बंध शिथिल झाले आहेत. शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, चित्रपट आणि नाट्यगृहे, अम्युझमेंट पार्क  आदी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरसकट जलतरण तलाव सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त स्पर्धांसाठी सराव करण्याकरिता तरणतलावांचा वापर करता येतो. उपनगरीय रेल्वेमध्ये लसीकरणाच्या दोन मात्रा झालेल्यांनाच प्रवासास परवानगी आहे. लशीची एक मात्रा घेतलेल्यांनाही रेल्वे प्रवासाला परवानगी देण्याची योजना आहे. तसेच सध्या क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत अनेक सेवांचा वापर करता येतो. ही मर्यादाही काढून टाकण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय हा दिवाळीनंतर घेतला जाईल.