scorecardresearch

बालकांच्या लसीकरणाला अल्प प्रतिसाद

राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बुधवारपासून सुरू झालेल्या १२ ते १४ वयोगटातील लसीकरणालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

मुंबई: राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बुधवारपासून सुरू झालेल्या १२ ते १४ वयोगटातील लसीकरणालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. कोविनच्या आकडेवारीनुसार राज्यात या वयोगटातील सुमारे १ हजार ३७७ बालकांचे पहिल्या दिवशी लसीकरण झाले आहे. बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून या वयोगटाचे लसीकरण सुरू होणार होते; परंतु कोविन अद्ययावत होण्यास उशीर झाल्यामुळे तीनच्या सुमारास लसीकरण सुरू झाले. राज्यात करोनाचा संसर्गप्रसार कमी झाल्यामुळे एकूणच लसीकरणाचा जोर कमी झाला आहे. या स्थितीमध्ये १२ ते १४ वयोगटातील लसीकरणाला तुलनेने कमी प्रतिसाद मिळत असल्याचे आढळले आहे. राज्यात दिवसभरात १ हजार ३७७ बालकांनी लस घेतली आहे.

मुंबईत ११७ बालकांचे लसीकरण

नायरमध्ये दिवसभरात दोन बालकांचे लसीकरण झाले, तर बीकेसीमध्ये ३९ बालकांनी लस घेतली आहे. कोविन सुरू होण्यास वेळ झाल्यामुळे लसीकरण दुपारी तीनच्या सुमारास सुरू झाले; परंतु बालकांची फारशी गर्दी नसल्यामुळे कोणतीही अडचण आली नाही, असे बीकेसीतील डॉक्टरांनी सांगितले. मुंबईत दिवसभरात या वयोगटातील ११७ बालकांनी लस घेतली आहे. मुंबईत गुरुवारी १२ ते १४ वयोगटाचे लसीकरण सकाळी नऊपासून सुरू होणार आहे.

राज्याला सुमारे ३९ लाख मात्रा प्राप्त राज्याला १२ ते १४ वयोगटाच्या लसीकरणासाठी कोर्बेव्हॅक्स लशींच्या ३९ लाख मात्रा मिळाल्या आहेत, तर मुंबईला १ लाख २२ हजार मात्रा मिळाल्या आहेत. राज्यात या वयोगटातील सुमारे ६५ लाख बालके आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Short response pediatric vaccination corona reducing incidence corona infection ysh

ताज्या बातम्या