महापालिकेची यंत्रणा तोकडी; शहरात निवारा केंद्रांची संख्या कमी;

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Women MP in parliement
Loksabha Election : महिला उमेदवारांची संख्या वाढतेय; पण जिंकणाऱ्यांचं प्रमाण का घटतंय? १९५७ पासूनची आकडेवारी काय सांगते?
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या

मुंबई : डोक्यावर हक्काचे छप्पर नसल्याने अनेक जण पदपथांवर किंवा मिळेल त्या जागी पथारी पसरतात. अशा बेघरांची संख्या मुंबईमध्ये सतत वाढत असून टाळेबंदीनंतर ही संख्या अधिकच वाढली आहे. या यंत्रणेला सामावून घेण्यासाठी पालिकेची निवारा केंद्रे आहेत खरी, पण ती यंत्रणादेखील तोकडी पडत आहे.

एकूणच जास्त लोकसंख्येचा भार वाहणाऱ्या मुंबईत बेघरांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. रेल्वे स्थानकांच्या फलाटावर, रेल्वे स्थानकांच्या बाहेरील पदपथावर, पुलाखाली बेघर वास्तव्यास असतात. मुंबईत लोहार चाळ, चर्नीरोड, मालाड, कुर्ला, दादर, माहीम अशा ठिकाणी बेघरांच्या वस्त्याच दिसतात. रस्त्यावरच सगळे विधी होत असल्यामुळे शहराचे विद्रूपीकरणही वाढते. टाळेबंदीच्या काळानंतर लोकांचा रस्त्यावरील वावर कमी झाल्यानंतर बेघरांचे अस्तित्व अधिकच जाणवू लागले, तर या काळात अनेकांचे रोजगार बुडाल्यामुळे बेघरांच्या संख्येत वाढच झाली. मात्र      

बेघरांसाठी असलेल्या निवाऱ्यांची संख्या तितक्या गतीने वाढली नाही. आता मात्र पालिकेच्या नियोजन विभागाने या बेघरांचे सर्वेक्षण करण्याचे ठरवले असून त्यांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतही शेल्टर मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आली असून या समितीने नुकतीच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेऊन बेघरांसाठी धोरण तयार करण्याची मागणी केली. त्यानुसार शहरी बेघरांसाठी धोरण बनविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यासाठी बेघरांचे सर्वेक्षणही करण्यात येत आहे. बेघरांना निवारा केंद्रांमध्ये तात्पुरता निवारा देणे, त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवून पुन्हा समाजामध्ये सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी करावयाचे प्रयत्न या बेघरांबाबतच्या धोरणामध्ये समाविष्ट असतील. त्यादृष्टीने शहरी बेघर व्यिक्तच्या मदतीसाठी १८००२२७५०१ हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांकही कार्यरत झाला आहे, अशी माहिती नियोजन विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दीघावकर यांनी दिली.

१२५ निवाऱ्यांची गरज

सर्वोच्च न्यायायलयाच्या आदेशानुसार एक लाख लोकसंख्येमागे एक बेघर निवारा केंद्र असावे. मुंबईची लोकसंख्या पाहता १२५ निवाऱ्यांची गरज आहे, असे मत बेघरांसाठी काम करणाऱ्या ‘पहचान’ या संस्थेचे ब्रिजेश आर्या यांनी व्यक्त केले. २०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत ५७ हजार ४१६ बेघर आहेत. मात्र गेल्या दहा वर्षांत ही संख्या दोन लाखांच्या आसपास गेली असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

बेघरांमध्ये ७० टक्के कुटुंबे

मुंबईतील बेघरांबाबत यापूर्वी एका खासगी संस्थेने सर्वेक्षण केले होते. बेघरांच्या एकूण लोकसंख्येत ७० टक्के कुटुंबांचा समावेश आहे, तर ३० टक्के बेघर हे एकटे राहणारे आहेत. यात परित्यक्ता महिला, घरातून हाकलून दिलेले वृद्ध, स्थलांतरित पुरुष, बालके यांचा समावेश असल्याचे ब्रिजेश यांनी सांगितले. या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची गरज असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

१२५ निवारा केंद्रांची गरज

* मुंबईत साधारण १२५ निवाऱ्यांची गरज असून प्रत्यक्षात प्रौढांसाठी केवळ १२ निवारा केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांची मिळून एकूण क्षमता ३४२ व्यक्ती सामावतील इतकी आहे. या केंद्रांमध्ये सद्यस्थितीत २३९ नागरिक वास्तव्यास आहेत.

* बेघर असलेल्या १८ वर्षे वयाखालील मुलांसाठी एकूण ११ निवारा केंद्र सुरु आहेत. या सर्व केंद्रांची मिळून एकूण क्षमता ५९० मुले सामावतील इतकी आहे. या केंद्रांमध्ये सद्यस्थितीत ४८८ मुले वास्तव्यास आहेत. दरवर्षी, पावसाळय़ात म्हणजे १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत अतिरिक्त बेघर निवारा केंद्रे सुरू करण्यात येतात.

प्रशासनाचे प्रयत्न

बेघर निवारा केंद्रांची पुरेशी संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. लवकरच चांदिवली, दहिसर, अंधेरी, गोवंडी येथे आणखी चार निवारा केंद्र कार्यान्वित होणार आहेत. तसेच माहुल येथे २२४ खोल्या बेघर निवाऱ्यासाठी उपलब्ध करून या ठिकाणी जवळपास १५०० व्यक्तींची व्यवस्था केली जाणार आहे. याच ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण केंद्रेही सुरू केले जाणार आहे. बेघरांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.