मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केल्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून त्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पटोले भाजपमधून काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे भाजपने असे म्हणावे का की पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांचा समाचार घेतला. गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करून काँग्रेसचा विश्वासघात केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की, पटोले यांचे वक्त्यव्य चुकीचे आहे. ते कुठून आले आहेत ते सर्वाना माहीत आहे. जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असे पवार यांनी त्यांना सुनावले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात माध्यमांशी बोलताना पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाच्या अनुच्छेदास स्थगिती दिली, त्यावरही भाष्य केले. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो सरकारला मान्य करावा लागतो. राजद्रोहाच्या अनुच्छेदाचा वापर करू नका असे न्यायालयाने सांगितले आहे, त्याचे केंद्र सरकारकडून पालन केले जाईल, असे ते म्हणाले.