मुंबई- गेल्या दशकाहून अधिक काळ टिटवाळा परिसरातील ६८ गावांसाठी आरोग्यदायी बनलेल्या श्री महागणपती रुग्णालय आता विस्ताराच्या प्रतिक्षेत असून आगामी काळात येथील आदिवासी पाडे तसेच दूरच्या गावांमध्ये जाऊन आरोग्य तपासणी उपचार करण्यासाठी मोबाईल हेल्थ युनिट सुरु करण्याचा संकल्प आहे. त्याचबरोबर रुग्णालयात हृदयविकारावरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी कॅथलॅब व सिटी स्कॅन सुरु करण्याची योजना श्री महागणपती रुग्णालयाने हाती घेतली असून यासाठी दानशूर लोक व संस्थांनी सढळ हस्ते मदत करणे अपेक्षित आहे.

तमाम गणेशभक्तांसाठी श्रद्धास्थान असणारं टिटवाळा हे गाव. नवसाला पावणारा गणपती अशी येथील श्रीमहागणपतीची ख्याती. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी या मंदिराची पुन:स्थापना केली होती. मात्र या ठिकाणी आरोग्यविषयक सेवासुविधांची वानवा होती. दवाखाने होते, पण अद्ययावत आरोग्यसेवा नव्हती. त्यामुळे काही आजार झाल्यास उपचारांसाठी थेट कल्याण गाठावं लागे. मोठ्या आजारासाठी थेट के.ई.एम. किंवा मुंबईतील मोठ्या रुग्णालयापर्यंत जाव लागे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी, टिटवाळ्यात अल्पदरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या तळमळीमधून विक्रांत बापट, किशोर गवाणकर, डॉ. पद्माकर वाघ, विलास पाटील, अजित म्हसाळकर, अभिजित जोशी, आनंद हरकरे यांनी २६ ऑक्टोबर २००० रोजी ‘क्रिएटिव्ह ग्रूप’ची स्थापना केली. यातून क्रिएटिव्ह पॉलिक्लिनिक सुरु करून त्याच्या माध्यमातून रुग्णोपचार तसेच आवश्यक त्या चाचण्या आणि पुढे वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात येऊ लागले. हळूहळू या उपक्रमाला प्रतिसाद मिळू लागला. जवळपास २८ डॉक्टरांनी या पॉलिक्लिनिकमध्ये आपली सेवा दिली. त्यातही डॉ. ऋता मराठे (नेत्ररोगतज्ज्ञ), डॉ. अजय सिर्सिकर (त्वचारोगतज्ज्ञ), डॉ. अमोल इटकर (कान-नाक-घसा तज्ज्ञ) आणि डॉ. किरण परांजपे (अस्थिरोगतज्ज्ञ) यांनी आपल्याला दिलेली साथ अनन्यसाधारण होती, अस विक्रांत बापट आवर्जून नमूद करतात. हे पॉलिक्लिनिक सलग यशस्वीपणे सुरू असताना लोकसेवेसाठी हॉस्पिटल बांधण्याची संकल्पना बाळावू लागली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

विक्रांत बापट यांना हिंदुजा रुग्णालयात काम केल्याचा अनुभव गाठीशी होताच, त्याचबरोबर श्री महागणपती हॉस्पिटलच्या निर्मितीत अनेकांनी मोलाची मदत केली. याबाबत बापट सांगतात “सुरुवातीच्या काळात सुयोग नाट्यसंस्थेचे सुधीर भट यांनी मला खूप मदत केली. दोन चॅरिटी शोच्या माध्यमातून बराच निधी उपलब्ध झाला. हिंदुजा रुग्णालयातील अनेक ज्येष्ठ डॉक्टरांनीही खूप पाठबळ दिलं. हिंदुजाचे सीईओ प्रमोद लेले हे सर्वार्थाने उभे राहिले. डोंबिवलीतील प्रमोद दलाल त्यांची जमीन रुग्णालयासाठी देणगी स्वरूपात दिली आणि जागेचा मोठा प्रश्न सुटला. त्याच काळात टिटवाळ्यातील महागणपती मंदिराने पहिल्या टप्प्यात तब्बल एक कोटी रुपयांची व नंतर 25 लाख रुपयांची देणगी हॉस्पिटलला दिली, एलअँडटी फायनान्सचे चेअरमन यशवंत देवस्थळी यांनी व्यक्तिगत स्वरूपात एक कोटी रुपये या हॉस्पिटलसाठी दिले आणि हॉस्पिटलच्या बांधकामाचा मार्ग प्रशस्त झाला. यातूनच २४ ऑक्टोबर २०१२ रोजी श्री महागणपती हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी सज्ज झाले.

पन्नास खाटांच्या या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी २५ डॉक्टरांचे पथक असून परिचारिका, साहाय्यक असा ५० जणांचा कर्मचारीवर्गही कार्यरत आहे. विविध प्रकारच्या तपासण्या (टूडी एको, सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एक्स रे, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या), आयसीयू, ऑपरेशन थिएटर, डायलिसिस सेंटर, अॅम्ब्युलन्स, २४ तास फार्मसी अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. बालरोग, कान-नाक-घसा, युरॉलॉजी, स्त्रीरोग, मधुमेह, हृद्रोग, अस्थिरोग, नेत्रोपचार, दंतोपचार, फिजिओथेरपी, गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, इमर्जन्सी विभाग असे विविध विभाग या रुग्णालयात कार्यरत आहेत. या सर्व विभागांशी संबंधित विविध सर्जरीजदेखील या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. वर्षाकाठी सुमारे २५ हजार रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी करण्यात येते तर तीन हजाराच्या आसपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून दोन हजाराहून अधिक बाळंतपणे रुग्णालयात पार पडल्याचे विक्रांत बापट यांनी सांगितले. तीन डायलिसीस मशिन असून त्याच्या माध्यमातून अडीचशे सायकल रुग्णांना महिन्याकाठी दिल्या जातात. आजपर्यंत आजुबाजूच्या ६८ गावांमध्ये लहान मुलांसाठी, महिलांसाठी तसेच सर्वांसाठी मिळून २५० हून अधिक आरोग्य शिबीरे घेण्यात आली असून यात जवळपास ३० हजार लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे बापट म्हणाले.

जसजशी आम्ही परिणामकारक रुग्णसेवा देऊ लागलो तशा लोकांच्या अपेक्षाही वाढू लागल्या आहेत. आज हृदयविकाराचे रुग्णही येथे मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्यावर तात्काळ जे उपचार करणे शक्य आहे ते आम्ही करतोच मात्र अँजिओग्राफी व अँजिप्लास्टीसाठी कॅथलॅब घेण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. तसेच सीटी स्कॅन असणेही आवश्यक झाले आहे. सिटी स्कॅन नसल्यामुळे पुन्हा त्यासाठी रुग्णांना कल्याण-डोंबिवली वा मुंबईत जावे लागते. त्याचप्रमाणे टिटवाळा परिसरातील दुर्गम गावांमध्ये जाऊन उपचार व चाचणी करण्यासाठी मोबाईल व्हॅन युनिट घेण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता असून कर्ज काढणे तसेच सीएसआर तसेच दानशूर व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे विक्रांत बापट यांनी सांगितले. सर्वच गोष्टी सरकारने कराव्या ही अपेक्षाच चुकीची आहे. समाजानेही पुढे येऊन स्वतसाठी व्यवस्था उभारणे गरजेचे आहे, असे आमचे मत असल्याचे बापट म्हणाले.

मांडा-टिटवाळ्यासारख्या खेड्यातील एक तरुण आणि त्याच्यासारखेच झपाटलेले साथीदार एक स्वप्न पाहतात. स्वप्नाच्या पूर्तीसाठी अथक परिश्रम घेताना पाहून मदतीचे अनेक हात पुढे येतात. त्यातून उभा राहतो तो श्री महागणपती हॉस्पिटलसारखा आरोग्यदायी प्रकल्प. विक्रांत बापट यांनी ‘समर्पण’ या आपल्या पुस्तकात या सार्या प्रवासाचं हृद्य रेखाटन केलं आहे. क्रिएटिव्ह ग्रूपपासून हॉस्पिटलच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास, त्यामागची रुग्णसेवेची तळमळ असाधारण म्हणावी लागेल. अर्थात यापुढच्या टप्प्यात मोबाईल युनिट, कॅथलॅब व सिटी स्कॅनच्या स्वप्नाची पूर्तता करायची असून यासाठी दानशूर लोकांच्या मदतीची गरज लागणार आहे.

Story img Loader