मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे) संगमेश्वरचे संपर्कप्रमुख, मनोहर डेकोरेटर्सचे सर्वेसर्वा आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे पती श्रीधर मुकुंद जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले पवन आणि सागर असा परिवार आहे. श्रीधर जाधव यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजसेवक आणि मराठी उद्योजक म्हणून श्रीधर जाधव यांची ख्याती होती. भोईवाडा येथील ओमकार वेदा टॉवर या निवासस्थानी दुपारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर भोईवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीधर जाधव यांचे अंत्यंदर्शन घेतले आणि जाधव कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यावेळी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.

शिवसेना (ठाकरे) नेते सुनील प्रभू, शिवसेना उपनेते – आमदार सचिन अहिर, मनोज जामसुतकर, आमदार अजय चौधरी, शिवसेना युवासेना- सचिव आमदार वरूण सरदेसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, नगरसेवक किरण तावडे, उर्मिला पांचाळ आदी यावेळी उपस्थित होते.