मुंबई : कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांनी महाड पोलिसांकडे प्रत्यार्पण केल्याची माहिती शुक्रवारी महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात दिली. त्यावर, याप्रकरणी गोगावले शिवसेना (शिंदे) आणि जगताप राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या राजकीय पक्षांचे नेते सहभागी आहेत. त्यामुळे, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यालाही अटक करावी लागेल, अशी मिश्किल टिप्पणी न्यायालयाने केली.

त्याचवेळी माजी आमदार माणिक जगताप यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते श्रीयांश जगताप यांच्याविरोधातील गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्यांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास इच्छुक नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यानंतर, अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका श्रीयांश यांनी मागे घेतली. त्यावर, श्रीयांश आणि विकास दोघेही आमदारांची मुले आहेत. फरक फक्त एक माजी, तर एक आजी आमदाराचा मुलगा आहे, असेही न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने केली.

विकास गोगावले यांना आत्मसमर्पण करण्यास सांगा, असे आदेश न्यायालयाने गुरुवारी सायंकाळी सुनावणीच्या वेळी दिले होते. याप्रकरणी, शुक्रवारी सुनावणी झाली असता, विकास गोगावले आणि त्यांचा चुलत भाऊ महेश गोगावले यांच्यासह या प्रकरणातील सर्व आरोपींनी शुक्रवारी सकाळी महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होती. मंत्र्यांची मुले गुन्हा करून मोकाट फिरतात. दुसरीकडे, मंत्री मात्र त्याच्या संपर्कात असतात. परंतु, पोलिसांना आरोपी सापडत नाहीत ? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का ? मुख्यमंत्रीही याप्रश्नी गप्प का ?, मंत्र्याच्या मुलाच्या प्रश्नी मुख्यमंत्री हतबल आहेत का ? अशा शब्दात न्यायालयाने सरकारची कानउघडणी केली होती. न्यायालयाच्या तडाख्यानंतर मंत्री भरत गोगावले आरोपीशी संपर्क साधून त्यांना पोलिसांपुढे शरणागती पत्कारण्यास सांगतील,अशी ग्वाही सरकारकडून न्यालालयाला देण्यात आली होती.