राज्याचे महाधिवक्ता या जबाबदारीच्या पदावर असताना महाराष्ट्र तोडण्याची भूमिका मांडणारे श्रीहरी अणे यांनी मंगळवारी सकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. अणे यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले होते. या मुद्द्यावरून शिवसेनेसह विरोधकांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते.

कोण आहेत अ‍ॅड. श्रीहरी अणे?

महाधिवक्ता अणे यांना पदावरून दूर करावे, अशा आशयाचे ठराव शिवसेना तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीने मांडले होते. अणे यांचा राजीनामा किंवा त्यांना पदावरून दूर केल्याची घोषणा मंगळवारी सरकारकडून न झाल्यास हे ठराव चर्चेला घेण्याची मागणी विरोधकांबरोबरच शिवसेनेकडून केली जाणार होती. त्या पार्श्वभूमीवर अणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
अणे प्रकरणावरून सोमवारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्यावर आधी बचावात्मक भूमिका घेणाऱ्या भाजपलाही शेवटी सभागृहात अणे यांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली. आशीष शेलार व राम कदम यांनी तर अध्यक्षांसमोरील मेजासमोर जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने घोषणा दिल्या. यावरूनच भाजपला नमते घ्यावे लागल्याचे स्पष्ट झाले.
जालना येथील एका कार्यक्रमात बोलताना अणे यांनी विदर्भापेक्षा मराठवाड्यावर अधिक अन्याय झाला असून वेगळ्या मराठवाड्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवण्याचे आव्हान केले. मराठवाडा व विदर्भात विषमता नसून साम्य आहे. या मराठवाड्यातही वेगळ्या राज्याच्या निर्मितीची मागणी होत असल्यामुळे मराठवाड्याच्या अस्तित्वाचा झेंडा उभारला जात आहे. वेगळ्या राज्याच्या निर्मितीसाठी नेतृत्व निर्माण करणारे घटक महत्त्वाचे असून, संघर्षाचीही तयारी ठेवावी लागते. वेगळ्या विदर्भाची मागणी ४० वर्षांपासून आहे. वेगळ्या राज्याच्या निर्मितीचा निर्णय दिल्लीत घेतला जातो. त्यामुळे दिल्लीवर दबाव आणला पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.