मुंबई : मनोरंजनविश्वात अनेक दशके रसिकांच्या मनात आपल्या सहजसुंदर अभिनयाची अमीट छाप सोडणार्‍या आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीची खणखणीत नाममुद्रा कोरणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना यंदाचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उद्या, शुक्रवार ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे हा संगीतमय सोहळा रंगणार आहे.

सोहळ्याला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुंबई महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी भिडे आणि पटकथाकार, दिग्दर्शिका, अभिनेत्री चित्रा पालेकर यांच्या उपस्थितीत ‘दुर्गां’चा सत्कार होणार असून, सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे आणि त्यांचे सहकारी सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांवर ‘नृत्यसुमन’ हा बहारदार नृत्याविष्कार सादर करणार आहेत.

बदलत्या काळात माध्यमे, चित्रपटांची भाषा बदलली तरी ज्यांचा चेहरा  जुन्या-नव्या रसिकांच्या स्मरणात चिरंतन राहिला आहे, अशा ज्येष्ठ कलावंत शुभा खोटे. ‘सीमा’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्‍या शुभा यांनी पुढे ‘अनाडी’, ‘छोटी बहन’, ‘गोलमाल’, ‘एक दूजे के लिए’, ‘सागर’, ‘कुली’पासून ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’पर्यंत अनेक दशकांतील चित्रपटांतून आपल्या देखण्या अभिनयाने आणि विनोदाची अचूक वेळ साधून प्रेक्षकांची मने जिंकली.

सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध वातावरणात वाढलेल्या शुभा यांनी केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे तर तरुणपणी क्रीडा क्षेत्रात विशेषत: जलतरण आणि सायकलिंगमध्ये प्रावीण्य मिळवले. ज्या काळात क्रीडा क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग दुर्मीळ होता, त्या काळात त्यांनी जलतरण आणि सायकलिंगमध्ये आपले कौशल्य राष्ट्रीय स्तरावर सिद्ध केले. मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या अतुल्य योगदानाबद्दल यंदा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कारा’ने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या स्त्रियांच्या कार्याची समाजासमोर ओळख करून देणे आणि त्यांच्या प्रवासातून इतरांना प्रेरणा मिळवून देणे, हा या पुरस्काराचा उद्देश आहे. यंदा १३ वे वर्ष आहे. या वर्षीही महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणार्‍या स्त्रियांची मोठ्या संख्येने नामांकने प्राप्त झाली होती.

दिग्दर्शिका व अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी, लेखिका व कवयित्री नीरजा तसेच सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या वर्षीच्या नामांकनाचे परीक्षण केले. तज्ज्ञ परीक्षकांच्या समितीकडून अंतिम निवड झालेल्या नऊ दुर्गांच्या कार्यकर्तृत्वगाथा नवरात्रीच्या नऊ दिवसांत ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. हा पुरस्कार सोहळा सर्वांसाठी खुला असून प्रथम येणार्‍यास प्राधान्य मिळणार आहे. काही जागा राखीव असतील.