मुंबई : टॅटूसाठी वापरण्यात येणारी शाई, अगरबत्तीमधील रसायने यांसारख्या ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या वस्तूंवर अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) नियंत्रण असावे, तसेच अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना वेगवेगळ्या विभागांचे परवाने घेण्याऐवजी एकच परवाना देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुंढे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर तिन्ही विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुंढे यांनी दिले.

टॅटूसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईच्या गुणवत्तेवर आणि त्यातील घटकांवर सध्या पुरेसे नियंत्रण नसल्याचा मुद्दा शुभा राऊळ यांनी उपस्थित केला. टॅटूच्या शाईमुळे काही व्यक्तींना त्वचेची अॅलर्जी, सूज यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही शाईमध्ये आर्सेनिक, क्रोमियम यांसारख्या विषारी धातूंसह अन्य घातक धातू आढळतात. त्यामुळे गंभीर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने टॅटूच्या शाईची गुणवत्ता, त्यातील रसायने आणि त्याच्या वापरावर नियंत्रण एफडीएचे नियंत्रण आवश्यक असल्याचे मत राऊळ यांनी व्यक्त केले. तसेच विविध पर्यटनस्थळे, हिल स्टेशन आणि जत्रांमध्ये टॅटू काढणारे पथाऱ्या पसरून बसतात. त्यामुळे शाईतील घटक, त्याचे संभाव्य दुष्परिणाम आणि सुरक्षिततेबाबत स्पष्ट नियम असणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. अगरबत्तीचा धूर देखील आरोग्याला हानीकारक असून त्यामुळे डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, घसा दुखणे व अस्थमासारखे रोग बळवतात. त्यामुळे अगरबत्ती हा विषय देखील एफडीएच्या नियंत्रणाखाली यावा. तसेच अगरबत्तीचा पाकिटवर उत्पादनातील रसायनाची माहिती नमूद असावी, असे मत राऊळ यांनी व्यक्त केले.

अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना एफडीएचे एफएसएसएआई आणि महानगरपालिकेचे परवाने घ्यावे लागतात. हे दोन्ही परवाने वेगवेगळ्या प्राधिकरणाकडून घेण्यापेक्षा एक छत्री कार्यक्रम राबवावा. तसेच महापालिका किंवा एफडीए यापैकी एकच परवाना पुरेसा असल्यास विक्रेत्यांना नूतनीकरणाचा त्रास होणार नाही, असेही त्या म्हणाल्या. या सर्व बाबींवर चर्चा झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राऊळ यांनी सांगितले.