मुंबई : फसवणुकीच्या आरोपातील एका ज्येष्ठ नागरिकाने वैद्यकीय आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून जामिनासाठी याचना केली. मात्र, मुंबईतील सत्र न्यायालयाने त्यांना मृत्यूनंतर दोन दिवसांनी वैद्यकीय जामीन मंजूर केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सुरेश दत्ताराम पवार (६२) असे त्यांचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल गायकवाड यांनी पवार यांना सहा महिन्यांसाठी वैद्यकीय जामीन मंजूर केला. मात्र, सुरेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती जामिनाचा आदेश देताना न्यायालयाला देण्यात आली नव्हती, असे स्पष्ट झाले आहे.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

पवार यांना २०२१ मध्ये फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. मालमत्ता व्यवहारातील मध्यस्थ असल्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप करून एका शिक्षिकेने सुरेश  आणि त्यांच्या पत्नीविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली होती. दोघांनी १६ जणांची २.४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता. पवार यांनी ३ मे रोजी वैद्यकीय जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात मधुमेह, फुप्फुस तसेच मूत्रिपडाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले होते. शिवाय जे. जे. रुग्णालयात आणि त्यापूर्वी कारागृह रुग्णालयात योग्य उपचार न झाल्याने ३० एप्रिल रोजी पाय कापावा लागल्याचा आरोपही पवार यांनी जामिनाच्या अर्जात केला होता. पायावरील शस्त्रक्रियेनंतर आपल्याला अतिदक्षता विभागात ठेवण्याऐवजी रुग्णालयाच्या सर्वसाधारण विभागात हलवण्यात आले. त्यामुळे प्रकृती आणखी खालावली आणि फुप्फुसांना संसर्ग झाल्याने आपल्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले, अशी विनंतीही पवार यांनी अर्जाद्वारे केली होती.

खासगी रुग्णालयात हलवल्यास पोलीस बंदोबस्तासाठी लागणारे शुल्क परवडणारे नसल्याने पवार यांनी वैद्यकीय जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर ४ मे रोजी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पवार यांच्या वकिलांना त्यांच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच अर्जावरील सुनावणी ६ मे रोजी ठेवली होती. परंतु, तपास अधिकारी आजारपणाच्या सुट्टीवर असल्याने पोलिसांनी अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. शिवाय पवार यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ९ मे रोजी पवार यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर अखेर सुनावणी पूर्ण झाली. पवार यांची प्रकृती चिंताजनक असून, कारागृहाच्या वातावरणात ते जिवंत राहू शकणार नसल्याचे त्यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. मात्र, प्रकरणातील मूळ तक्रारदाराने हस्तक्षेप अर्जाद्वारे पवार यांच्या वैद्यकीय जामीन अर्जाला विरोध केला. पवार यांच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल सादर करण्यात आला नसल्याचे सांगून पोलिसांनीही त्याच्या अर्जाला विरोध केला.

  न्यायालयाने पवार याच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला. मात्र, अन्य प्रकरणांत व्यग्र असल्याने न्यायालयाने पवार यांच्या अर्जावर ११ मे रोजी निर्णय देऊन त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर केला. परंतु, त्याच्या दोन दिवस आधीच पवार याचा जे. जे. रुग्णालयात  मृत्यू झाला.

उच्च न्यायालयाचे आदेश..

उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने पवार यांनी २३ एप्रिल २०२३ रोजी जामीन याचिका मागे घेतली होती. मात्र, पवार यांना योग्य ते उपचार उपलब्ध करून देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. प्रकृती खालावल्याने पवार यांनी सत्र न्यायालयात वैद्यकीय जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर करण्याआधीच पवार यांनी जगाचा निरोप घेतला होता.