मुंबई : ऐंशीच्या दशकात आंबेडकरी चळवळीचे धगधगते केंद्र म्हणून पुढे आलेले वडाळा येथील सिद्धार्थ वसतीगृह पुन्हा दिमाखात उभे राहणार आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने या वसतीगृहाच्या पुनरुज्जीवनासाठी ४१ कोटी २१ लाख रुपयांच्या निधीस नुकतीच मंजुरी दिली आहे.

संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. त्याअंतर्गत वडाळा येथे  संस्थेचे ‘सिद्धार्थ’ वसतीगृह होते. वसतीगृहाची इमारत जीर्ण झाल्याने ती धोकादायक जाहीर केल्यावर वसतीगृह बंद करण्यात आले होते. या वसतीगृहाची पुनर्रचना करावी, असा सामाजिक न्याय विभागाकडे आंबेडकरी कार्यकर्त्यांचा व संस्थेचा पाच वर्षांपासून पाठपुरावा चालू होता. मात्र, १५ कोटींपेक्षा अधिक निधीचा प्रस्ताव असल्याने तो उच्चस्तरीय समितीसमोर प्रलंबित होता.

या वसतीगृहाच्या दिरंगाईबाबत ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी आंदोलने केली होती. या वसतीगृहात राहून शिक्षण घेतलेले रामदास आठवले केंद्रात मंत्री असूनही प्रकल्प मार्गी लागत नव्हता. फडणवीस सरकारच्या पहिल्या टर्मच्या काळातील सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या काळातील प्रस्ताव अखेर मंत्री संजय शिससाट यांच्या कार्यकाळात मंजूर झाला आहे. संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.

सिद्धार्थ वसतीगृहाच्या आधाराने आंबेडकरी चळवळीतील हजारो तरुण शिकून पुढे आले. दलित साहित्य चळवळ, दलित पँथरची स्थापना, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ अशा अनेक लढ्यांचे सिद्धार्थ साक्षीदार आहे. सिद्धार्थ उभे राहत आहे, मात्र सिद्धार्थचे संचालन करणाऱ्या पीपल्स एज्युकेशनमध्ये आंबेडकर आणि आठवले गटांमध्ये व्यवस्थापनावरून वाद चालू आहेत. दोन्ही गटांकडून संस्थेवर आपलेच वर्चस्व असल्याचे दावे केले जातात.