मुंबई : सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या सराफ व्यावसायिकाची सोन्याचे दागिने असलेली ट्रॉली बॅग चोरी करणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलिसांनी सहा महिन्यांच्या अथक तपासानंतर पर्दाफाश केला. या प्रकरणात १ कोटी ६२ लाख २७ हजार ५०० रुपयांच्या किंमतीच्या १ किलो ९८.५०० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या लगड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही घटना ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०.४० ते ७ डिसेंबर रोजी सकाळी ६.५० या वेळेत घडली होती. फिर्यादी अभयकुमार जैन (५२), त्यांचा सोन्याचे दागिने विक्री करण्याचा व्यवसाय आहे. ते सोलापूरहून कल्याणकडे गाडी क्रमांक १२११६ अप सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या ए-१ डब्यामधील सीट क्रमांक ४९ वरून प्रवास करत होते. त्यांनी दोन ट्रॉली बॅगा सीटखाली साखळीने लॉक करून ठेवलेल्या होत्या. मात्र, प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या झोपेचा फायदा घेत सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा चोरी करून नेल्या. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर आणि पोलीस उपआयुक्त प्रज्ञा जेडगे यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान सोलापूर ते कल्याणदरम्यान सिद्धेश्वर एक्स्प्रेस ज्या-ज्या स्थानकांवर थांबली. त्या सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली. तसेच सोलापूर सराफ बाजारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.
या तपासात एकूण १० आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. आरोपी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका परिसरातील असल्याचे समोर आले. आरोपींमध्ये रमेश डिकोळे, फुलचंद उर्फ परमेश्वर उर्फ सरपंच छगन गुंजाळ, दिलीप गुंजाळ, धनराज उर्फ धनंजय गुंजाळ, हिरा उर्फ दीपक गुंजाळ, सुरेश उर्फ लाल्या गुंजाळ, पुणेकर उर्फ शिवण्या डिकोळे, सागर डिकोळे, विकास डिकोळे आणि भारत काळे यांचा समावेश आहे.
स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, दंगल नियंत्रण पथक यांच्या मदतीने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, कव्हे, वडशिंगे या गावांमध्ये वारंवार छापेमारी करण्यात आली. या कारवाईत रमेश डिकोळे, फुलचंद गुंजाळ, धनराज गुंजाळ आणि पुणेकर उर्फ शिवण्या डिकोळे या चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
अटक आरोपींकडून सोन्याच्या लगड्या जप्त करण्यात आल्या.
- २५० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड – किंमत ३५ लाख रुपये – ५४८.५०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड – किंमत ८२ लाख २७ हजार ५०० रुपये
- ३०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड – किंमत ४५ लाख रुपये
अशा एकूण १ कोटी ६२ लाख २७ हजार ५०० रुपयांच्या किंमतीच्या १ किलो ९८.५०० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या लगड्या हस्तगत करण्यात आल्या.
