Siddheshwar Express Robbery Attempt: मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणी ९ महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.कुर्डूवाडी स्थानकावर २२ एप्रिल रोजी कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रतिबंध व शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांना ३ महिला संशयास्पदरित्या फिरताना दिसल्या. या महिलांकडे विचारपूस करण्यात आली. त्यानंतर त्यांना स्थानकातून निघून जाण्याचा इशारा देऊन सोडण्यात आले.

या महिला गाडी क्रमांक २२१०८ लातूर एक्स्प्रेसमध्ये चढताना दिसल्या आणि त्यानंतर सोलापूर पथकाला संपूर्ण मार्गावर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. महिला जेऊर स्थानकात उतरल्या. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने त्या गाडी क्रमांक १२११५ सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये चढल्या होत्या. पाठलाग करत असलेले आरपीएफचे पथक सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांना संदेश देत होते. तसेच संशयितांवर सतत पाळत ठेवत होते.

महिला हवालदार सोनम पठाण यांच्यासह आरपीएफ कर्मचाऱ्यांचे एक पथक सोलापूर स्थानकावर सज्ज होते. या ठिकाणी सर्व ९ आरोपी महिलांना ताब्यात घेण्यात आले. या संशयित महिला १८ ते ४० वर्षे वयोगटातील असून त्या धाराशिवमधील रहिवासी आहेत. आरोपींना कुर्डूवाडी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१०(४) नुसार दरोड्याची तयारीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत. प्रवाशांना कोणत्याही संशयास्पद हालचाल दिसल्यास रेल्वे अधिकाऱ्यांना कळवण्याचा किंवा मदतीसाठी मदत क्रमांक १३९ वर संपर्क साधण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.