मुंबई: प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी, दर्शनासाठी लागणारा वेळ आणि उपलब्ध सुविधांवरील पडणारा ताण लक्षात घेऊन मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने न्यासाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मंदिरालगतची राम मॅन्शन सहकारी गृहनिर्माण संस्था खरेदी करण्याच्या व्यवहारावरील दोन कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. मंगळवार, संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी तसेच गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे दर्शनासाठी रांगा लावणे, भाविकांची ये-जा नियंत्रित करणे आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हे मंदिर प्रशासनापुढे महत्त्वाचे आव्हान निर्माण झाले आहे. मंदिराच्या आसपास जागेची मर्यादा असल्याने भाविकांसाठी अतिरिक्त सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने लगतची जागा उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिराच्या जवळची राम मॅन्शन सहकारी गृहनिर्माण संस्था खरेदी केली आहे. या संस्थेचे क्षेत्रफळ ७०८ चौरस मीटर आहे. या इमारतीत १३ सदनिका आणि सात व्यावसायिक गाळे आहेत. या मालमत्तेच्या खरेदीसाठी ९४ कोटी ११ लाख ६५ हजार ५५० रुपयांच्या व्यवहाराला यापूर्वी मान्यता देण्यात आली आहे. या जागेचा उपयोग भाविकांच्या रांगांचे नियोजन आणि व्यवस्थापन, प्रसादालय, स्वयंपाकगृह, यात्रीनिवास तसेच मर्यादित वाहनतळ उभारण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना अधिक शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता येण्याबरोबरच भोजन आणि निवासाच्या सुविधाही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या खरेदी व्यवहारासाठी नियमानुसार दोन कोटी ३२ लाख ३८ हजार ७०० रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागले असते. मंदिर न्यासाच्या माध्यमातून भाविकांसाठी सुविधा निर्माण होणार असल्याने लोकहिताचा विचार करून हे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे न्यासावरील आर्थिक भार कमी होणार आहे.
